माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी कृषिमंत्री शरद पवार यांनी या भागाच्या विकासासाठी राबविलेली धोरणे यापुढे तशीच राबवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. दुष्काळी भागाचा विकास हेच आपले कर्तव्य राहील अशी ग्वाही माढा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
खटाव तालुक्यातील औंध येथे जाहीर सभेत ते बोलत होते. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, अनिल देसाई, सोनाली खरमोडे, अ‍ॅड. विलास इंगळे, कविता म्हेत्रे, जितेंद्र पवार, मानसिंगराव माळवे, मदनराव मोहिते पाटील, सत्यवान कांबळे, दीपक नलवडे, संजय वायदंडे, शहाजीराव देशमुख, नंदकुमार मोरे, धनाजी आमले, वसंतराव गोसावी, जे. बी. जाधव, जालिंदर राऊत या वेळी उपस्थित होते.
मोहिते पाटील म्हणाले, की माढा मतदारसंघातील बहुतांश परिसर हा दुष्काळी असून, केंद्र शासनाच्या विविध योजना राबवून या भागाचा सर्वागीण विकास साधण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागतील. त्यासाठीच मला या मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील प्रश्न वेगळे असतात. अगोदर या भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पाणी, रस्ते, शिक्षणाच्या सोयी आदी या भागांतील प्रमुख प्रश्न आहेत. ग्रामीण भागाचा विकास हा स्थानिक संस्थांच्या माध्यमातून होत असल्याने, त्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांना जास्तीतजास्त निधी मिळवून देणे गरजेचे आहे. रणजितसिंह देशमुख, प्रभाकर घार्गे, सदाशिवराव पोळ, दिलीप येळगावकर, हणमंत शिंदे, एस. पी. देशमुख, सुरेश पाटील यांची या वेळी भाषणे झाली.