News Flash

गल्लीबोळात फिरणारे पहिले पंतप्रधान -नारायण राणे

गल्लीबोळात फिरणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात प्रथमच पाहिला. यापूर्वीच्या पंतप्रधानांची लोकप्रियता नरेंद्र मोदीमुळे कमी झाली,

| October 14, 2014 01:33 am

गल्लीबोळात फिरणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात प्रथमच पाहिला. यापूर्वीच्या पंतप्रधानांची लोकप्रियता नरेंद्र मोदीमुळे कमी झाली, असे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी सांगून भाजपने ६७ आयात उमेदवारांना उमेदवारी दिली असून, गुन्हेगारी पाश्र्वभूमी असणारांच्या प्रचाराला मोदी राज्यात फिरताहेत अशी टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली. सावंतवाडी मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत नारायण राणे यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. यावेळी उमेदवार बाळा गावडे, डॉ. जयेंद्र परुळेकर, संदेश पारकर, प्रमोद सावंत, विकास सावंत, पक्ष निरीक्षक के. सुरेशराव, जितेंद्र निंबाळकर, खासदार भालचंद्र मुणगेकर आदी उपस्थित होते.
देशाच्या पंतप्रधानांनी देशाचे हित पाहिले, पण मोदींनी गुजरात राज्याचे पंतप्रधान असल्याची प्रतिमा निर्माण केली. राज्यात गल्लीबोळात फिरून २५ सभा मोदी घेत आहेत, पण यापूर्वी पंतप्रधानांनी असे केले नव्हते असे राणे म्हणाले.
शिवराय महाराष्ट्राचे, त्यांनी हिंदवी स्वराज्य महाराष्ट्रात स्थापन केले ते मोदीचे कसे, असा प्रश्न उपस्थित करून सरदार वल्लभभाई पटेलांच्या स्मारकाला पैसे देणाऱ्या मोदींना शिवरायांचे अरबी समुद्रात उभारले जाणारे स्मारक दिसले नाही, असे नारायण राणे यांनी सांगून भाजपने स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी ६७ उमेदवार आयात केले. गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या उमेदवारांना उमेदवारी दिली असल्याची टीका राणे यांनी केली.
महाराष्ट्रातील भाजपचा एक तरी नेता धुतल्या तांदळासारखा असल्यास पंतप्रधान मोदींनी त्यांचे नाव जाहीर करावे, असे आवाहन राणे यांनी करून सीमेवर गोळीबार सुरू असून पाकडय़ाना कंठस्नान करण्याची भाषा करणाऱ्या मोदींच्या जॅकेटमधून गोळीच निघत नाही काय? असा प्रश्न उपस्थित करून भाजपने लोकांना फसविले असून भाजप हा बनवाबनवी पक्ष असल्याची टीका राणे यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत भाजप टाळ्या मारणारे लोक खास दर देऊन भाडोत्री आणतात, असे राणे यांनी सांगून पंतप्रधानांनी वास्तववादी चित्र ठेवावे, फक्त बेताल थापाडे बनू नये असे राणे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस हा वादावादी पक्ष असल्याचे सांगत राणे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. शिवसेनेत तीन पेने वापरणाऱ्या मनोहर जोशी मुख्यमंत्री असतानाची माहिती देत शिवसेना निष्क्रिय पक्ष असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरेची कोणती कंपनी आहे की त्यातून घरसंसार चालवितो, परदेश दौऱ्यावर जातो असा खुला प्रश्न उपस्थित करून शिवसेनेने मराठी माणसाच्या अस्मितेचा बाजार मांडला आहे अशी खरमरीत टीका राणे यांनी केली.
खासदार विनायक राऊत, शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर, भाजपचे उमेदवार राजन तेली व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश दळवी यांच्यावर राणे यांनी प्रहार केला. दीपक केसरकर व राजन तेली यांच्यावर राणे शैलीत टीका केली. उमेदवार बाळा गावडे यांनी नारायण राणे यांच्या २५ वर्षांच्या पुण्याईवर लोक मला विजयी करतील, जनतेच्या सर्वागीण विकासासाठी राणे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असे ते म्हणाले. यावेळी खासदार भालचंद्र मुणगेकर, पक्ष निरीक्षक के. सुरेशराव, डॉ. जयेंद्र परुळेकर, अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 1:33 am

Web Title: narayan rane slams narendra modi in maharashtra assembly poll
टॅग : Narayan Rane
Next Stories
1 तटकरे आणि जयंत पाटील एकाच नाण्याच्या दोन बाजू – उद्धव ठाकरे
2 ‘सिंधुदुर्गात शांतता व समृद्धी आणा’- दीपक केसरकर
3 ‘मुख्यमंत्रीपद’ राणेंचे ‘स्वप्न’च राहील – मनोहर पर्रिकर
Just Now!
X