राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते आणि आता भाजपात असलेल्या हर्षवर्धन पाटील हे पुण्यातील कार्यक्रमात खुर्चीला खुर्ची लावून बसलेले दिसले. दोघांमध्ये गप्पाही झाल्या. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत असताना दोघेही एकाच व्यासपीठावर गप्पा मारताना बघून अनेकांच्या भूवया उंचावल्या.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात स्थानिक राजकारणावरून मतभेद आहेत. काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करताना हर्षवर्धन पाटील यांनी पक्ष सोडण्याचं सगळं खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडलं होतं. राष्ट्रवादीमुळे आपण काँग्रेस सोडत असल्याचं ते म्हणाले होते. त्याचबरोबर त्यानंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचं माझ्यावर खुप प्रेम आहे, अस उपरोधिकपणे पाटील म्हणाले होते. विधानसभा जागावाटपावरून अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील संबंध चिघळले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे यांच्याविरोधात जोरदार आघाडीच उघडली होती. इंदापूर मतदारसंघातील प्रचारसभेत अजित पवारांनी आमदार होऊ देणार नाही, असं आव्हानच दिलं होतं. राजकीय मैदानात आमनेसामने आलेल्या अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील आजच्या भेटीनं अनेकांना धक्का दिला.

पुण्यात वसंतदादा पाटील शुगर इन्सिस्ट्यूटची ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित होते. मात्र, सभा सुरू होण्यापूर्वी अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील खुर्चीला खुर्ची लावून बसल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे दोघांमध्ये बराच वेळ चर्चाही झाली. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे गुलदस्त्यात असलं, तरी राजकीय मतभेदानंतर दोघे एकत्र दिसल्यानं उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केलं.

आणखी वाचा – शब्द न पाळणाऱ्यांशी संघर्ष केलेले मुख्यमंत्री ठाकरे शब्द पाळतील – शरद पवार

यापूर्वी भाजपाचं चार दिवसाचं सरकार कोसळल्यानंतर अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एका लग्न समारंभात शेजारी बसलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरून बरीच राजकीय चर्चा रंगली होती. मात्र, आम्ही हवा पाण्याच्या गप्पा मारल्या, असं खुलासा अजित पवार यांनी सांगितलं होतं.