फडणवीस सरकारच्या काळात टँकर घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अहमदनगरमध्ये दुष्काळाच्या काळात फडणवीस सरकारने टँकर घोटाळा केला. तसेच जलयुक्त शिवार योजनेतही भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. याप्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. अहमदनगरच्या जिल्हा नियोजन बैठकीत रोहित पवार बोलत होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ अहमदनगरला आले होते. त्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत आमदार रोहित पवार यांनी फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील रस्ते, शाळा यांसाठी मोठा निधी मागितला असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. या बैठकीत रोहित पवार यांनी फडणवीस सरकारच्या काळात दुष्काळ पडला असताना टँकर छावणी आणि इतर दुष्काळ निवारण कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. या बैठकीत प्रामुख्याने तीन मागण्या झाल्या. ज्यामध्ये जलयुक्त शिवार, टँकर घोटाळा आणि चारा छावण्या हे तीन विषय होते. या तिन्ही विषयांबाबत उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गेल्या आठवड्यात संगमनेर या ठिकाणी झालेल्या युवा महोत्सवात आदित्य ठाकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, आदिती तटकरे आणि जिशान सिद्दीकी या युवा आमदारांची मुलाखत अवधूत गुप्ते यांनी घेतली होती. या मुलाखतीत सगळ्याच तरुण आमदारांनी अवधूत गुप्ते यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. दरम्यान आज रोहित पवार हे जेव्हा बैठकीसाठी अहमदनगरमध्ये आले होते तेव्हा त्यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.