कोठडीतील मृत्युप्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

अनिकेतचा पोलीस कोठडीतील मृत्यू आणि या कुकृत्यावर पांघरूण घालण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. राज्यातील गृहखात्याचा प्रशासनावर वचक राहिलेला नसल्याचे यातून स्पष्ट होते, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केली. या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

जिल्हाधिकारी विजय काळम यांनी आदेश देऊनही अनिकेतच्या कुटुंबाची अद्याप फिर्याद दाखल करून घेतलेली नाही. यामागे आरोपींना वाचविण्याचा किंवा शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय असून, या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास करणे गरजेचे आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

या प्रकरणामुळे पोलीस दलाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा खून सुपारी देऊन करण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, केवळ सीआयडीकडे तपास सोपवून वेळकाढूपणा केला जात असल्याचे दिसून येत आहे, असे चव्हाण म्हणाले. अनिकेतच्या खुनाबाबत राज्य आणि केंद्र मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ प्रतिनिधी पाठवून माहिती घेण्याऐवजी स्वत सांगलीला भेट देऊन राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित असल्याबाबत राज्यातील जनतेला आश्वस्त करण्याची गरज आहे, असेही चव्हाण म्हणाले.चव्हाण यांनी सोमवारी सकाळी अनिकेतच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच घटनेबाबत त्यांच्याकडून माहिती घेतली. यावेळी माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.