– प्रशांत देशमुख, वर्धा

संचारबंदीच्या काळात मनोरूग्ण व अन्य अनाथ यांच्या भूकेची चिंता वाहणाऱ्या काही युवकांना प्रशासनाचे सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे.

टप्याटप्याने संचारबंदी कडक होण्याच्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध घटकांचे प्रश्न प्रकर्षाने पूढे येत आहे. आजपासून भाजीपाला, किराणा, धान्य दुकान दोन वाजेपर्यत व पेट्रोलपंप पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा आदेश आहे. संचारबंदीच्या धाकात सेवा हळूहळू ठप्प होत असल्याने उपेक्षितांवर संकट कोसळत आहे. सर्वसाधारण परिस्थितीत मनोरूग्ण, भिकारी व अन्य अनाथांना वेगवेगळ्या पध्दतीने भूक भागविण्याची सोय असते. देवळातील भाविक त्यांची पोटाची व्यवस्था प्रामुख्याने करतात. आता या काळात या सर्वांवर भूकेचा प्रश्ना आ वाचून उभा असल्याचे दिसून आल्यावर वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या युवकांनी जेवणाचे डबे अशा अनाथांना जागेवरच पोहोचविण्याचा उपक्रम सुरू केला. गत दोन दिवसापासून प्रामुख्याने मनोरूग्णांना डबा दिला जात आहे. हे मनोरूग्ण संचारबंदीच्या काळात मोठमोठ्या कॉम्प्लेक्स, ओसाड धर्मशाळा, मंदिराच्या पाठीमागे दडले आहेत. त्यांना शोधून परिषदेचे युवक जेवणाचा डबा देतात. जाताना जेवणाचा कागदी डबा पाहून पोलीस सोडून देतात. मात्र येताना असा डबा नसल्याने या युवकांना पोलीसांची हडेलहप्पी सहन करावी लागते.

विशेष म्हणजे संघटनेच्या युवकांनी कोणाचीही मदत न घेता आळीपाळीने घरच्याच जेवणाचा डबा देण्याचे ठरविले. बारा युवकांनी आपले काम वाटून घेतले आहे. घरी जे जेवल्या जाते तेच या सहा मनोरूग्णांनाही मिळते. पूढील टप्प्यात भिकाऱ्यांनासुध्दा जेवण पोहोचविण्याचा मनसुबा आहे. संघटनेचे निरज बुटे म्हणाले की आम्ही व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून आवाहन केल्यानंतर काही मनोरूग्णांची माहिती मिळाली. त्यांना कोणी जवळही उभे करीत नाही. मानसिक संतूलन बरोबर नसल्याने ते व्यथाही मांडू शकत नाही. म्हणून संचारबंदीच्या काळात आम्ही युवक त्यांच्या भूकेचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्हाला या धावपळीत प्रशासनाने ओळखपत्र दिल्यास मदत करणे सुलभ होईल. तसे झाल्यास भिकाऱ्यांनाही जेवण देण्याची बाब सुटेल.