लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : वेतन निश्चिती व फरकाच्या रकमेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी पाच लाखांची लाच मागितल्या प्रकरणी जिल्हा उपनिबंधक व जीएसटीच्या सहायक आयुक्ताला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहात पकडले. जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे व वस्तू व सेवा कर विभागाचे सहायक आयुक्त अमर शेठ्ठी असे आरोपींची नावे आहेत. जिल्ह्यात एकाच वेळी वर्ग एकचे दोन अधिकारी लाच प्रकरणात अडकल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील एका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्याने १० जून रोजी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्ररीनुसार, त्यांचे व त्यांच्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्याचे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिाती करणे व फरकाच्या रकमेच्या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे यांनी विक्री व सेवा कर विभागाचे सहायक आयुक्त अमर शेठ्ठी यांच्या मार्फत प्रथम फरकाच्या रकमेच्या ५० टक्के व नंतर पाच लाखांच्या लाचेची मागणी केली. तक्रारप्राप्त झाल्यावर १० जून ते ४ जुलैपर्यंत उपअधीक्षक एस.एस. मेमाणे यांनी केलेल्या पडताळणी कारवाईमध्ये दोन्ही अधिकाऱ्यांनी कामाच्या मोबदल्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी अर्धी रक्कम देण्याचे ठरले होते. दरम्यान, अमर शेठ्ठी याच्या महाजनी प्लॉट येथील घरी आज लाच देण्याचे ठरले. त्यानुसार एसीबीने सापळा रचला. अमर शेठ्ठी याने तक्र्रारदाराकडून लाचेची रक्कम दोन लाख रुपये स्वीकारले.

तक्रारदाराने दोन लाख रुपये असल्याचे सांगितल्यावर, ‘तुमच्याकडे पूर्ण रक्कम आली तेव्हा द्या’ असे म्हणून लाचखोर अधिकाऱ्याने तक्रारदाराला रक्कम परत केली. लाच प्रकरणी एसीबीच्या पथकाने दोन्ही आरोपींना रंगेहात पकडले. आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक एस.एस. मेमाणे यांच्या नेतृत्वात सापळा पथकाने केली.