राज्यातील सरकार स्थापने दिशेनं शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसनं आज एक पाऊल टाकलं आहे. समान कार्यक्रम ठरवण्यासाठी तिन्ही पक्षांची आज मुंबईत बैठक पार पडली. यानंतर भाजपाच्या हालचालींना देखील वेग आल्याचे दिसत आहे. या तिन्ही पक्षांच्या बैठकीनंतर आता भाजपाने देखील निवडूण आलेल्या सर्व १०५ आमदारांसह सहकारी पक्षांच्या आमदारांसह समर्थन दिलेल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्रामुख्याने राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीसह अन्य प्रमुख मुद्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिली आहे.

बैठकीसंदर्भात माध्यमांना माहिती देताना शेलार यांनी सांगितले की, आज भाजपाच्या निवडूण आलेल्या सर्व १०५ आमदारांची बैठक प्रथमच भाजपा कार्यालयात होत आहे. या बैठकीत आम्हाला समर्थन देणाऱ्या सहयोगी पक्षाचे आमदार देखील उपस्थित आहेत. ज्या अपक्ष आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाला समर्थन दिलं आहे ते आमदार देखील उपस्थित आहेत. आणि आता सुरू झालेल्या या बैठकीत प्रामुख्याने तीन महत्वाच्या मुद्यांवर पुढील काही तास चर्चा होणार आहे.
यातील पहिला मुद्दा म्हणजे राज्यातील आजची राजकीय परिस्थिती याविषयावर आमदारांशी संवाद देवेंद्र फडणवीस हे साधणार आहेत. याचबरोबर अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच नुकसान झालं आहे, त्या शेतकऱ्यांना मदत पोहचवण्याचा कार्यक्रम या विषयावर सर्व आमदारांशी चर्चा होईल. तिसरा मुद्दा म्हणजे भाजपाच्या अंतर्गत संघटनात्म निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यामुळे या अंतर्गत निवडणुकीच्या कार्यक्रमावरही चर्चा केली जाणार आहे.

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी राज्यातील महाशिव आघाडीच्या (शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस) नेत्यांची बैठक गुरुवारी मुंबईत झाली. या बैठकीत शहर विकास, पायाभूत सुविधा व शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर ध्येय-धोरणं आखण्यासंबंधी विचार विनिमय करण्यात आला. समान कार्यक्रमाचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला असून, फक्त तिन्ही पक्षश्रेष्ठींची मोहोर उमटायची औपचारिकता राहिली आहे.

याबैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, प्रवक्ते नवाब मलिक, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई हे उपस्थित होते. या बैठकीत शहर विकास, पायाभूत सुविधा व शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर ध्येय – धोरणे आखण्यासंबंधी विचार विनिमय करण्यात आला आहे. या बैठकीनंतर बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला होता.