छत्रपती संभाजीनगर : आंतरमशागतीसाठी कोळपणी करताना बैलांऐवजी स्वत:च्या खांद्यावर जू घेणाऱ्या ७६ वर्षांच्या अंबादास गोविंद पवार यांच्या छायाचित्रावरून विधिमंडळात गदारोळ झाला आणि त्यांना खूप सारी आश्वासने मिळाली. अभिनेता सोनू सूद याने ट्रॅक्टर घेऊन देण्याचे आश्वासन दिले.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्यावरील कर्ज भरू, असे सांगितले. पण हडोळतीच्या या शेतकऱ्याला चिंता आहे ती नातवाच्या शिक्षणाची. ‘शेतीचं जमवून आणू हो, पण दोन नातवांच्या इंग्रजी शाळेचे शुल्क देण्यामुळे हैराण झालो.’ अनेक जण आश्वासने देऊ लागली आहेत, असं मान्य करत थरथरत्या आवाजात अंबादास पवार म्हणाले, ‘अजून काही कोणाची मदत मिळाली नाही. पण इंग्रजी शाळेचं शिक्षण काही परवडत नाही.’
हाडोळती गावाचे अंबादासराव पवार आणि त्यांची पत्नी मुक्ताबाई या दोघांनी या वर्षीही साडेचार एकरावर भाड्याने ट्रॅक्टर लावून पेरणी केली. अर्धे सोयाबीन आणि अर्धा कापूस. कापूस लागवडीची महिलांची मजुरी दोन हजार रुपये. ट्रॅक्टरचे भाडे अडीच हजार. एकूण पेरणीसाठी आठ हजार रुपये खर्च झाल्याचे पवार यांनी सांगितले. एक भाऊ वारलेला त्यामुळे त्यांचीही जमीन पवार कसतात.
एक मुलगी, एक मुलगा असा त्यांचा परिवार. मुलीचे लग्न लावून दिले. त्या आता परभणी येथे राहतात. जावई कंपनीमध्ये नोकरी करतो. मुलगा पुण्याजवळ एका कंपनीत नोकरी करतो. त्याची पत्नी आणि मुले मात्र अंबादास पवार यांच्याकडे असतात. नात अंजली आणि नातू श्रेयस यांच्या शिक्षणासाठी लागणारे ४५ हजार रुपयाचे शुल्क मात्र आता त्यांना जड हाेऊ लागले आहे. आंतरमशागतीसाठी ट्रॅक्टर वापरता येत नाही. कोळपणीसाठी बैल असतील, तरच हे काम नीट करता येते. ग्रामीण भागात आंतरमशागतीमध्ये तण काढण्यासाठी डुबे वापरले जाते. त्यासाठी बैल लागतात. बैल कमी झाल्याने मशागतीसाठी तीन-साडेतीन हजार रुपये अडवून मागितले जातात.
ही रक्कम वाचवून नातवाच्या शाळेचे शुल्क भरण्याचे त्यांनी ठरवले होते. शिशुप्रेम प्रायमरी स्कूलमध्ये शिकणाऱ्या या दोन मुलांसाठी बैलाऐवजी खांद्यावर जू घेणारे अंबादासराव हैराण होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना मदत करू, असे खूप सारे दूरध्वनी येऊ लागले आहेत. नव्या आश्वासनामध्ये ७६ वर्षांच्या या व्यक्तीला शिक्षणासाठी वाढलेला खर्च अधिक गर्तेत ओढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.