सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या विरोधात पोलिसांनी दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा, तसेच संबंधित स्टिंग ऑपरेशनची चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक मराठा समाजाचे सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
सपाटे यांच्या मालकीच्या हॉटेलसमोर त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.तसेच मराठा मंदिरचे संस्थापक बाबासाहेब गावडे यांच्या नावाने उभारलेल्या सांस्कृतिक भवनाचे नामांतर करून मनोहर सपाटे यांचे नाव दिल्याबद्दल आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त करीत त्या सांस्कृतिक भवनावरील सपाटे यांचा नामफलक फाडून तेथे बाबासाहेब गावडे यांच्या नावाचा फलक पुन्हा लावला.
छत्रपती शिवाजी प्रशाला आणि वरिष्ठ महाविद्यालयाची पालक संस्था असलेल्या ६५ वर्षे जुन्या मराठा समाज सेवा मंडळाचे सपाटे हे अध्यक्ष आहेत. त्यांना पदमुक्त करून शासनाने ही शिक्षण संस्था ताब्यात घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
मराठा मंदिर संस्थेचे सोलापुरात हरिभाई देवकरण प्रशालेच्या पाठीमागे विद्यार्थी वसतिगृह आणि बाबासाहेब गावडे सांस्कृतिक भवन आहे. हे वसतिगृह आणि सांस्कृतिक भवन संस्थेने काही वर्षांपूर्वी मराठा समाज सेवा मंडळाला दिले होते. परंतु, गावडे यांचे नाव बदलून सपाटे यांचे नाव सांस्कृतिक भवनाला देण्यात आले होते. ही बाब या निमित्ताने समोर आली असता आंदोलकांनी मराठा मंदिराच्या सांस्कृतिक भवनात धाव घेतली आणि तेथील मनोहर सपाटे यांच्या नावाने लावलेला फलक फाडून पुन्हा बाबासाहेब गावडे यांच्या नावाचा फलक लावला.
आंदोलनात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते पुरुषोत्तम बरडे, प्रताप चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राजन जाधव, भाजपचे अनंत जाधव, काँग्रेसचे विनोद भोसले, सुनील रसाळे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार आदींचा प्रामुख्याने सहभाग होता.
सपाटे यांच्याविरुद्ध यापूर्वीही लैंगिक शोषण, विनयभंगाचे काही गुन्हे प्रलंबित आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कार्यरत असलेल्या प्रशाला आणि महाविद्यालयाशी संबंधित संस्थेच्या अध्यक्षपदावर त्यांनी राहणे हा शिवाजी महाराजांचा अवमान आहे, अशा शब्दांत आंदोलकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.