Ajit Pawar Angry Reaction on Reporters over Dhananjay Munde Resignation Demand : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव प्रमुख आरोपी म्हणून पुढे आलं आहे. वाल्मिक कराडवर या हत्येसह इतरही अनेक गुन्ह्यांची नोंद असून त्याची सीआयडीकडून चौकशी चालू आहे. वाल्मिक हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असून त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. वाल्मिक कराडच्या धनंजय मुंडेंबरोबरच्या जवळच्या संबंधांमुळे त्यांच्यावरही आरोप होत आहेत. तसेच विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दुसऱ्या बाजूला पोलीस चौकशीतील कथित अनियमिततेवर प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी घालत असल्याचाही आरोप होऊ लागला आहे. दरम्यान, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवार संतापल्याचं पाहायला मिळालं. काही वेळापूर्वी अजित पवारांनी वार्ताहरांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कारवाई होईल”.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार म्हणाले, “यासंदर्भात किती वेळा तेच तेच सांगायचं? या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, चौकशीत जे दोषी आढळतील त्या सर्वांवर कारवाई होईल”. दरम्यान, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी अजित पवारांना म्हणाले, “आतापर्यंत जेव्हा जेव्हा एखाद्या मंत्र्यावर अथवा नेत्यावर असे आरोप झाले आहेत तेव्हा तेव्हा त्या नेत्याने आपल्या पदाचा राजीनामा देत चौकशीचा सामना केला आहे. मात्र, धनंजय मुंडेंच्या बाबतीत तसं होताना दिसत नाही. तुम्ही त्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप होत आहे. यावर अजित पवारांचा पारा आणखी चढला. ते म्हणाले, “अरे बाळा, आतापर्यंत लोक चौकशीला सामोरे गेले आहेत हे खरं आहे. मात्र, तुझी चौकशी केव्हा होईल? तुझं नाव आरोपी म्हणून समोर येईल किंवा त्या प्रकरणात तुझं नाव घेतलं जाईल तेव्हाच तुझी चौकशी होईल. तुझं नाव नसेल तर बळं बळं तुझी चौकशी करतील का रे?”

हे ही वाचा >> सरपंचाच्या मृत्यूमुळं बीड पुन्हा हादरलं; राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं चिरडलं, आमदार सुरेश धसांनी व्यक्त केला संशय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संतोष देशमुख हत्याप्रकरणात ६ आरोपी अटकेत

पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत ६ आरोपींना अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी संतोष देशमुख हत्याप्रकरण पहिली मोठी अग्निपरीक्षा आहे. आरोपी वाल्मिक कराडला आत्मसमर्पण करण्यासाठी २० दिवस का लागले, हत्याप्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार का आहे, असे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत.