ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चांगलाच तापू लागला आहे. विशेषत: मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यात विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सुरू केली आहे. भाजपाकडून राज्याला ओबीसी आरक्षण लागू न करता आल्याबद्दल सत्ताधारी महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारला सुनावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे.

“ओबीसी आरक्षण हा धक्का नाही, धोका”

पंकजा मुंडेंनी आज ओबीसी आरक्षणाविषयी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर निशाणा साधला. “ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत. राज्य सरकारने याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षण महाराष्ट्राच्या हातातून गेलं. हा फार मोठा गुन्हा आहे. ओबीसी आरक्षण हा धक्का नसून धोका आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. यासंदर्भात विचारणा केली असता अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत दाखल होण्याची ऑफर देऊ केली आहे.

“..अशा लोकांना पंकजाताईंनी लाथ मारावी”

अमोल मिटकरींनी पंकजा मुंडेंना भाजपा सोडण्याचं आवाहन केलं आहे. “ज्यांच्या वडिलांनी हा पक्ष वाढवला त्या पंकजाताईंना जनआक्रोश मोर्चामध्ये साधं सन्मानाचं स्थान मिळालं नाही. मी तर पंकजाताईंना विनंती करतो, की जिथं आपला अपमान होत असेल, अशा लोकांना लाथ मारावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दारं आपल्यासाठी उघडी आहेत. तुमच्यासारख्या बहिणींची आम्हालाही आवश्यकता आहे”, असं मिटकरी म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अमोल मिटकरींनी आज सकाळी मनसे आणि राज ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. मनसेकडून शरद पवारांची बृजभूषण सिंह यांच्यासोबतचे फोटो शेअर केल्यानंतर त्यावर अमोल मिटकरींनी खोचक ट्वीट करत राज ठाकरेंचा शरद पवारांसोबतचा फोटो ट्वीट केला होता. “आधारवड”. पवार साहेब! (काही फोटो चांगलेही असतात आणि खरेही! हिंदीत भाषांतर जाणीवपूर्वक टाळले आहे)”, असा संदेश ट्वीटसोबत मिटकरींनी लिहिला आहे. या ट्वीटमध्ये राज ठाकरे शरद पवारांना एका कार्यक्रमात स्टेजवर चढण्यासाठी मदत करताना दिसत आहेत.