सातारा : पायी पायी पंढरीला । माझा वारकरी निघाला, वाटे थांबे विसाव्याला | खेळ विठूचा मांडीला, चाले रिंगण सोहळा | खेळ विठूचा मांडीला |
या भक्तिगीताचा प्रत्यय देणारा सोहळा चांदोबाचा लिंब येथे दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो. मात्र, यावर्षी या रिंगण सोहळ्याला वारकरी आणि भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला. तीन वेळा जागा बदलत हा रिंगण सोहळा शुक्रवारी पार पाडला. या वेळी गोंधळ झाल्याने आयत्या वेळी पोलिसांनाच भाविकांच्या गर्दीत रिंगण लावावे लागले.
लोणंद येथे मुक्कामी असलेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने सकाळी तरडगावच्या (ता. फलटण) दिशेने प्रस्थान ठेवले. या मार्गात वाटेत चांदोबाचा लिंब येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण पार पडते. यंदाही नेहमीच्या ठरलेल्या जागेवर यासाठीची प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली होती. या साठी दोन्ही बाजूला पोलीस, स्वयंसेवक व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी संरक्षक दोर लावले होते. यासाठी परिसरातील हजारो भाविकांनीही गर्दी केली होती. मात्र, आज या स्थळी पालखी पोहोचताच ती तशीच काही अंतर पुढे गेली. यातून गोंधळ उडाला.
दरम्यान, पालखीसोबतच रिंगणात धावणारे अश्वही पुढे गेले. भाविकांची प्रचंड गर्दी, दिंड्याची रांग यामुळे पुढे नव्या जागेवर अखेर हे रिंगण घेण्याचा निर्णय घ्यावा लागला. यासाठी मग पुन्हा जागेचा शोध होत तब्बल तीनवेळा ही जागा बदलण्यात आली. अखेर ठरलेल्या जागेपासून अर्धा किलोमीटर अंतरावर नवे रिंगण लावण्यात आले. मात्र, तोवर भाविकांमध्ये मोठा गोंधळ उडाला.
नव्या जागेवरील व्यवस्था पार पडताच रिंगण लावण्यात आले. बंदोबस्ताचे रिंगणही उभे राहिले. स्वयंसेवकांनी दोर धरले आणि मग पालखी सोहळ्याभोवतीच्या या रिंगणात माउलींचा मानाचा अश्व उतरला. तो धावू लागताच हजारो वारकऱ्यांनी जयघोष केला. सोबतीने टाळ, मृदंगाचा गजर सुरू झाला. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्याला हजारो वारकऱ्यांसोबतच परिसरातून आलेल्या भाविकांनी डोळ्यात साठवले.
या ऐनवेळीच्या जागा बदलामुळे पालखी सोहळ्यात काहीकाळ गोंधळ उडाला. प्रशासनाबरोबरच पोलिसांनाही मोठी मेहनत घ्यावी लागली. पोलीस, होमगार्ड आणि भाविकांमध्ये वादावादीचे प्रसंग झाले. पालखी सोहळ्याचे विश्वस्त आणि पोलीस यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हा प्रकार घडला. हा रिंगण सोहळा पार पडल्यावर पालखी तरडगाव (ता. फलटण) येथे मुक्कामासाठी दाखल झाली. उद्या पालखी फलटणकडे प्रस्थान ठेवणार आहे.