महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या नवीन सरकारला पाठिंबा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान केलं आहे. असं असताना आता आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात भूमिका मांडायला सुरुवात केली आहे.

आम्ही सरकारला पाठिंबा दिला आहे, याचा अर्थ असा नाही की, आम्ही जे चाललंय ते सर्व खपवून घेऊ, असं विधान राजू पाटील यांनी केलं आहे. राजू पाटील यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ठाणे, डोंबवली आणि कल्याण परिसरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर राजू पाटील यांनी हे विधान केलं आहे.

हेही वाचा- लवासाप्रकरणी HCने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; पवार कुटुंबीयांसह प्रतिवाद्यांना न्यायालयाची नोटीस

माध्यमांशी संवाद साधताना राजू पाटील म्हणाले की, “रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी टास्क फोर्स बनवत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केली होती. पण अशा प्रकारचं काम आमच्या भागात कुठेही झालं नाही. डोंबिवली, कल्याण भागातही असं काम झालेलं दिसत नाही. ठाण्याचे मुख्यमंत्री असताना परिसरातील खड्डे भरले जावेत, अशी आमची अपेक्षा आहे.”

हेही वाचा- Patra Chawl Land Case: संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही सरकारला समर्थन दिलं आहे, याचा अर्थ असा नाही की, आमचा यांच्या वाईट गोष्टींना समर्थन आहे. यावर कुणीतरी बोलायला पाहिजे. त्यामुळे आम्ही बोलतोय. त्यामागची भावना कुणावरही टीका करण्याची नाही, तर अशा कामांकडे लक्ष वेधण्याची आहे. जिथे कामं झाली नसतील, तिथे आम्ही बोलणार आहोत. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या सरकारला पाठिंबा दिला आहे, याचा अर्थ असा होत नाही की, राज्यात जे काही चाललंय ते सर्व खपवून घेऊ, जिथे-जिथे अन्याय दिसेल, तिथे आम्ही बोलणार” असा इशारा राजू पाटील यांनी दिला आहे.