Ban Protests In South Mumbai, Says MP Milind Deora After Manoj Jarange Patil’s Protest: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून चार दिवस मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण केले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी राज्यातून लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाले होते. यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, आता शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित इथून पुढे आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी बंदी घालावी, अशी विनंती केली आहे.

वारंवार होणारी आंदोलने

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात खासदार मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे की, “दक्षिण मुंबईतील आझाद मैदान आणि इतर ठिकाणी वारंवार होणारी आंदोलने व मोठ्या मेळाव्यांबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे. लोकशाहीने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला असला तरी, यामुळे सामान्य नागरिकांच्या जगण्याच्या आणि काम करण्याच्या अधिकारांवर याचा कोणताही परिणाम होऊ नये.”

दक्षिण मुंबई राज्याच्या प्रशासनाचे केंद्रस्थान

“दक्षिण मुंबई फक्त आपल्या राज्याच्या प्रशासनाचे केंद्रस्थान नाही तर ती राजकीय आणि आर्थिक केंद्र देखील आहे. येथे महाराष्ट्र सरकारचे मंत्रालय, विधान भवन, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय, मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची कार्यालये तसेच पश्चिम नौदल कमांड आहे. हे वित्तीय संस्था, कॉर्पोरेट मुख्यालये आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे केंद्रही आहे, ज्यावर लाखो लोक दररोज अवलंबून असतात”, असेही देवरा पत्रात म्हणाले आहेत.

दक्षिण मुंबईत आंदोलने करण्यासाठी बंदी घालावी

त्यांनी पुढे म्हटले की, “जगातील कोणतेही राजधानीचे शहर आपल्या प्रशासन, सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य संस्थांना आंदोलनांमुळे वारंवार अपंग होऊ देत नाही. शांततापूर्ण आंदोलने लोकशाहीचा अविभाज्य भाग असली तरी, यामुळे सरकार, नगरपालिका प्रशासन, सुरक्षा दल किंवा खाजगी क्षेत्राचे कामकाज कमकुवत होऊ नये. म्हणूनच मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की, त्यांनी दक्षिण मुंबईत आंदोलने करण्यासाठी बंदी घालावी किंवा आंदोलनांसाठी इतरत्र जागा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत. यामुळे नागरिकांचे हक्क सुरक्षित राहतील, प्रशासनाचे काम अखंडपणे सुरू राहील आणि मुंबई महाराष्ट्र व भारताची आर्थिक आणि राजकीय राजधानी म्हणून कार्यरत राहील.”

शरद पवार गटाची प्रतिक्रिया

दरम्यान, राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रवार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. एका वाक्यत प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले की, “मिलिंद देवरा यांनी कधी आंदोलन केले आहे का? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या माणसाला आंदोलनाबाबत काय माहिती असणार.”