Ashok Chavan : विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. या निवडणुकीच्या निकालानंतर (Maharashtra, Assembly Election 2024) महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्कारावा लागला. तसेच या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल. याबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये सरकार स्थापनेबाबत मोठ्या हालचाली सुरु आहेत. महायुतीमधील मुख्यमंत्री कोण होईल? यावर सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, असं असलं तरी या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसह काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसवर सत्ताधारी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.

आता भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या पराभूत झालेल्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. “ज्यांनी-ज्यांनी त्रास दिला ते सगळे साफ झाले. लातूरला एक पडला आणि दुसरा निसटता निसटता निघाला”, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी अमित देशमुख, धीरज देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यावर टीका केली. त्यांच्या या विधानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Sharad Pawar : महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल? शरद पवारांचं मार्मिक भाष्य; म्हणाले, “भाजपाच्या कुणी नादाला लागेल असं…”

अशोक चव्हाण काय म्हणाले?

“लातूरला एक पडला आणि दुसरा निसटता निसटता निघाला आहे आणि हे महाराष्ट्राचं नेतृ्त्व करणार? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे माझ्यावर टीका करून गेले. भोकर, नांदेडकडे खूप लक्ष देत होते. पण ते निवडणुकीत फक्त १५० मतांनी निवडून आले आणि हे नेते महाराष्ट्राचं नेतृत्व करणार? त्या पक्षात काय राहिलंय? पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात हे माजी महसूलमंत्री. हे सगळे काल साफ झाले. सर्वजण निवडणुकीत पडले. ज्यांनी-ज्यांनी मला त्रास दिला ते सर्व साफ झाले. त्यामुळे मला त्रास देऊ नका”, असं अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं आहे.

काँग्रेसच्या कोणत्या मोठ्या नेत्यांचा पराभव झाला?

बाळासाहेब थोरातांचा पराभव

विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा पराभव झाला आहे. आत्तापर्यंत त्यांनी आठवेळा निवडणूक लढवली होती आणि ते एकदाही हरले नव्हते. मात्र आता नवव्या वेळी त्यांचा पराभव झाला. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो.

पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला आहे. भाजपाचे डॉ. अतुलबाबा भोसले हे या मतदारसंघातून विजयी ठरले आहेत. महाविकास आघाडीची मोट बांधण्याकरता पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर होते. तसंच, महाविकास आघाडीची सत्ता आल्यास पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होऊ शकतील, अशी शक्यताही बांधली जात होती. परंतु, त्यांचा दारुण पराभव झाला.

धीरज देखमुखांचा पराभव

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर ग्रामीणमधून धीरज देखमुख यांचा पराभव झाला आहे. धीरज देखमुख यांच्यासाठी अभिनेता रितेश देशमुख यांचा प्रचार केला होता. मात्र, तरीही धीरज देखमुख यांचा पराभव झाल्यामुळे मोठा धक्का बसला.

यशोमती ठाकूर यांचा पराभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा तिवसा विधानसभा मतदारसंघात पराभव झाला आहे. त्यांच्या विरोधात भाजपाचे राजेश वानखडे विजयी झाले आहेत. खरं तर राज्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांचा पराभव झाल्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे.