scorecardresearch

राज ठाकरेंच्या भाषणाचं चंद्रकांत पाटलांकडून कौतुक, म्हणाले…

”मला राज ठाकरेंचा एक शब्द खूप आवडेलला आहे की…” असंही म्हणाले आहेत.

(संग्रहीत छायाचित्र)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल(शनिवार) गुढीपाडव्या निमित्त शिवाजी पार्कवरून केलेल्या भाषणानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या भाषणात राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर सडकून टीका केली, तर भाजपावर टीका करणं मात्र त्यांनी टाळलं. शिवाय, राज्यातील मदरशांवर कारवाई करण्याची पंतप्रधान मोदींकडे मागणी देखील त्यांनी केली आहे. राज ठाकरेंच्या कालच्या भाषणानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. शरद पवार यांनी आज राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले, त्या पाठोपाठा शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील राज ठाकरेंवर निशाणा साधला. त्यानंतर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली, राज ठाकरेंच्या कालच्या भाषणाचं राज ठाकरे यांनी जाहीर कौतुक केलं आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ”एका सामान्य हिंदूला मनामध्ये आनंद होणारं भाषण झालं. मला राज ठाकरेंचा एक शब्द खूप आवडेलला आहे की, मी धर्मांध नाही पण धर्माभिमानी आहे. आपल्या देशात १९९४७ नंतर सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्षता याचं इतकं स्तोम माजलं की, हिंदूंना हिंदू म्हणून घ्यायला लाज वाटायला लागली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे सगळं श्रेय जातं की, १९२५ पासून डॉ. हेडगेवार यांनी सातत्याने ही जाणीव देण्याचा प्रयत्न केला की, पाच हजार वर्षाचा उज्ज्वल इतिहास तुमचा आहे. ५०० वर्षांचा मुघलांच्या आक्रमणाचा इतिहास तुमचा नाही. त्यामुळे हिंदू आहे याचा मला गर्व असला पाहिजे. पण सातत्याने पुस्तकातून शिक्षणातून, भाषणातून हे मांडण्याचा प्रयत्न झाला, की हिंदू म्हणजे बुरसटलेला. खरं म्हणजे हिंदू या शब्दामध्ये धर्मनिरपेक्ष भाव आहे. हिंदू या शब्दामध्येच सर्वधर्म समभाव आहे. या देशातील मुसलमान हा बाहेर, जाऊ शकत नाही तो या देशाचा नागरिक आहे. खरंतर त्याने या देशाला स्वत:चा देश मानलं पाहिजे, पाकिस्तानाला मानू नये. त्याने या देशाबद्दल अभिमान बाळगला पाहिजे.”

तसेच, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील विधान केलं. ”या निवडणुकीला पूर्णपणे आम्ही विकासाच्या दिशेने नेतो आहोत. महाविकास आघाडीचे नेते ती पर्सनलवर नेण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आम्ही त्यांच्या या जाळ्यात फसणार नाही. आम्ही काय केलं, तुम्ही काय केलं? आम्ही काय करणार आहोत, तम्ही काय करणार? यावरच ही निवडणूक गेली पाहिजे असं माझं मत आहे.” असं ते म्हणाले.

मतदारांच्या खात्यावर पेटीएमद्वारे पैसे पाठवण्याचा डाव –

याचबरोबर, मी दोन दिवसांपूर्वीच तुम्हाला म्हणालो होतो की, एका शिक्षण संस्थेचे तरूण-तरूणी घरोघरी फिरून फॉर्म भरून घेत आहेत. ज्यामध्ये बँक अकाउंटसह सर्व तपशील घेतला जात आहे यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे, आता निवडणुकीच्या काळात तुम्हाला कोणी काम दिलं? हे विचारलं पाहिजे. माझी पक्की माहिती आहे की, पेटीएमच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्याची ही पूर्वतयारी आहे. मी नागरिकांना सावध करू इच्छितो की, पंतप्रधान मोदींनी चार राज्य जिंकल्यानंतर दिल्लीतील भाजपाच्या मुख्यलायात भाषण करताना सांगितलं होतं की भ्रष्टाचार करायचा आणि कारवाई झाल्यानंतर आराडाओरडा करायची हे मी चालू देणार नाही. त्यामुळे एक हजार रुपये प्रति माणूसं याबाबत देखील ईडीकडून चौकशी होईल की हे पैसे आले कुठून? आणि हे पैसे ज्याने पाठवले त्याने आणले कुठून? त्यामुळे आजच आम्ही ईडीला एक पत्र लिहतो आहोत, की फार मोठी देवाण घेवाण, स्वत:चा काळा पैसा हा मतदारांच्या खात्यावर पेटीएमने ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न होणार आहे. मी नागरिकांना विनंती करतो की एक हजार रुपयांच्या मोहापाई नाही ते शुक्लकाष्ट तुम्ही आपल्या मागे लावून घेऊ नका.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandrakant patil appreciates raj thackerays speech msr

ताज्या बातम्या