छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर धनंजय मुंडे यांनी दोन नव्हे तर तीन भेटी घेतल्याचे वृत्त धडकते ना धडकते तोच महादेव मुंडे खून प्रकरणातही माजीमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे पुन्हा लक्ष्य झाले आहेत. बीडमध्ये शुक्रवारी घेण्यात आलेल्या मेळाव्यात धनंजय मुंडे यांचे जिल्ह्यातील पक्षांतर्गत आणि अन्य राजकीय पक्षातील विरोधक एकवटले असून, त्यांनी मुंडेंवर गुंडगिरीचा आरोप केला आहे.
बीडमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मेळाव्यात महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अप) आमदार प्रकाश सोळंके, राजेभाऊ फड, विजयसिंह बांगर, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आदी नेते उपस्थित होते.
महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनीही धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले. महादेव मुंडे यांचे कुटुंबीय आणि मुख्यमंत्र्यांची भेट होऊ नये म्हणून तुम्ही प्रयत्न करता, तुम्हाला जातीचे लोक मारण्यासाठी मंत्रीपद पाहिजे आहे का, असा हल्लाबोल करत जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले. पाटील यांनी पंकजा मुंडेंवरही टीका केली. मुंडे बहीण-भावाने समाजाचा तळतळाट घेऊ नये, असे सांगत जरांगे पाटील यांनी पदासाठी निवडून येण्यासाठी जगू नका, अशा शब्दांमध्ये सुनावले. जात कोणतीही असन द्या, लेकीने हाक दिली तर मदतीला या, असे आवाहन करत मुंडे हत्या प्रकरणात पुढील आठ दिवसात आरोपी अटक झाली नाही तर बीड जिल्ह्यात कडकडीत बंद ठेवण्यात येईल, असा इशाराही पाटील यांनी दिली.
आमदार संदीप क्षीरसागर यांनी सुडाच्या राजकारणाचा परळी पॅटर्न संपवावा लागेल, अशी टीका करून संगीत डिघोळे ते किशोर फडपर्यंतच्या खुनाचा उल्लेख करताना अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले. रामकृष्ण बांगर यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हेही सुडाचे राजकारण असल्याचे सांगितले. माजी आमदार सय्यद सलीम यांनी धनंजय मुंडे यांनी सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला. लुकडे महाराज यांनी परळीकरांना गुंडगिरीच्या जोखडातून मुक्त करण्याचे आवाहन केले. खासदार बजरंग सोनवणे यांनीही धनंजय मुंडे यांनी जिल्हा बदनाम केल्याचे वक्तव्य करणे हे नौटंकी असल्याचे सांगत खिल्ली उडवली.
संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचे जवळचा सहकारी वाल्मिक कराड सध्या कारागृहात आहे. त्यामुळे बदनाम झालेल्या मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. गेल्या काही दिवसात ते सक्रिय होत असताच पुन्हा एकदा महादेव मुंडे प्रकरणामुळे मुंडे विरोधक एकत्र दिसू लागले आहेत. आता महादेव मुंडे प्रकरणाचे सर्व पक्षीय सभेचे नेतृत्व मनोज जरांगे यांनी हाती घेतले आहे. नुकतेच या प्रकरणात राज्य सरकारने विशेष तपास पथक गठित केले आहे.