सांगली : समलिंगी संबंधास नकार दिल्याच्या कारणावरून मित्राचा तलावातील पाण्यात बुडवून खून करण्याचा धक्कादायक प्रकार आरग (ता. मिरज) येथे सोमवारी उघडकीस आला आहे. या खूनप्रकरणी त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी दिली.
आरग येथील सुजल बाजीराव पाटील (वय २१) हा तरुण २८ जून रोजी बेपत्ता झाला होता. याप्रकरणी त्याच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तो दोन मित्रांसोबत दिसला असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता खुनाचा प्रकार उघडकीस आला.
मृत तरुण एका मित्रासोबत २८ जून रोजी बेळंकी (ता. मिरज) येथील एका लग्नातील हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. या ठिकाणी तिघांनीही मद्य प्राशन केले. गावी परतत असताना मृताशी त्याच्या मित्रांनी संबंध करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करताच झटापट झाली. दोघांनीही त्याला मारहाण करून तलावात बुडवले.पोलिसांनी संशयित मुलांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, दोघांनीही खून केल्याची कबुली दिल्याचे निरीक्षक श्री. सिद यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी तलावातील पाण्यातून तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.