सातारा : छत्रपती शिवरायांचा पराक्रम गडकोटांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. यामध्ये केंद्र व राज्य सरकारचा पाठपुरावा निश्चित महत्त्वाचा आहे. या गडकोटांच्या संवर्धनाचा आराखडा सांस्कृतिक व पर्यटन विभाग आणि पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे पर्यटन व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

साताऱ्यात पत्रकार परिषदेत देसाई बोलत होते. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील आदी उपस्थित होते.

बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या वारसास्थळात स्थान मिळाल्यामुळे पोवई नाका येथील शिवतीर्थावर जोरदार जल्लोष करण्यात आला. शिवभक्तांनी येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुष्पहार अर्पण केला. पोलीस दलाच्या जाहीर मानवंदना देण्यात आली. शिवभक्तांनी उपस्थितांना पेढे व साखर वाटून आनंद व्यक्त केला.

देसाई म्हणाले, की छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या गडकोटांच्या वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी मागील दोन वर्षांपासून सांस्कृतिक व पर्यटन विभागाचा पाठपुरावा सुरू होता. केंद्र सरकार, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनेस्कोच्या समितीकडे गडकोट किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व, त्यांची भूरचना याची माहिती आणि वैशिष्ट्ये तपशीलवार मांडली. वेगवेगळ्या देशांच्या राजदूतांना गडकोट किल्ल्यांची माहिती देण्यात आली.

या किल्ल्यांच्या स्थापत्याचे एकमेवत्व मान्य करून युनेस्कोच्या संवर्धन समितीने शिवकालीन गडकोट किल्ल्यांना वारसा स्थळांमध्ये स्थान दिले आहे. यामध्ये स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड, राजगड, शिवपराक्रमाचा साक्षीदार किल्ले प्रतापगड, शिवरायांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी, लोहगड, साल्हेर, पन्हाळा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी व जिंजी (तमिळनाडू) या किल्ल्यांचा समावेश या यादीमध्ये झालेला आहे. या किल्ल्यांना सैनिकी लँडस्केप म्हणून ओळखले जाते. यापुढे हे किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जातील. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनाला वेगळी ओळख मिळून येथे पर्यटन वाढेल. तसेच स्थानिक रोजगारांमध्येसुद्धा वाढ होणार आहे.

गड पर्यटनाचा पहिला टप्पा तयार

पर्यटन विभागाचा अधिभार घेतल्यापासून महाराष्ट्रात पर्यटन वाढावे यासाठी आमच्या विभागाचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील रायगड, शिवनेरी, सिंहगड, प्रतापगड, अजिंक्यतारा आणि पन्हाळा या किल्ल्यांना पर्यटनाच्या दृष्टीने सुविधा देणे आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ऐतिहासिक स्वरूपाच्या इमारती पुनर्जीवित करणे असा गड पर्यटन आराखडा बनवण्यात आला आहे. प्रतापगडाचे काम यापूर्वीच सुरू झाले असून, अन्य गडांची कामे लवकरच सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वारसास्थळांमध्ये बदल नको

जिल्ह्यातील कमळगड, वर्धनगड, भूषणगड व अन्य किल्ल्यांना जिल्हा नियोजन समिती, तसेच सांस्कृतिक विभागाशी संवर्धन धोरण काय आहे, या दृष्टीने चर्चा करून निर्णय घेतला जाईल. ‘युनेस्को’च्या यादीत समावेश होतील, अशी अनेक जुनी ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारी दुर्मीळ मंदिरे आहेत. किकली (ता. वाई), कातरखटाव, गुरसाळे (ता. खटाव) शिखर शिंगणापूर (ता. माण) या मंदिरांना रंगरंगोटी आणि इतर बदल केल्याने स्थापत्य कला झाकोळली गेल्याची बाब निदर्शनास आणून दिली असता, देसाई म्हणाले, की संबंधित स्थानिक मंदिर समित्यांना आणि सर्व ग्रामपंचायतींना नोटीस बजावून वारसा स्थळे असणाऱ्या मंदिरांमध्ये कोणतेही अनावश्यक बदल करू नयेत, अशी सूचना देण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किल्ल्यांवरील जुने रहिवासी जे आहेत, जे वंशपरंपरेने तेथे निवास करतात, त्यांच्या कार्यक्षेत्रावर, रहिवासावर, तेथील पारंपरिक व्यवसायावर, कामावर कोणत्याही मर्यादा येणार नाहीत. मात्र, त्यांना त्यांच्या खासगी जागेत बांधकाम करताना शासनाच्या नियोजित आराखड्याप्रमाणेच काम करावे लागेल.- शंभूराज देसाई, पर्यटनमंत्री