आरोपीस तीन दिवस कोठडी; तरुणी बनून रक्कम उकळली

यवतमाळ : दिल्ली येथील एका नामांकित डॉक्टरला समाजमाध्यमाद्वारे ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून तरुणी असल्याचे भासवत दोन कोटी रुपये उकळणाऱ्या संदेश अनिल मानकर (२१, रा. अरुणोदय सोसायटी, यवतमाळ) यास येथील न्यायालयाने ७ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

याप्रकरणी दिल्लीतील डॉक्टरने यवतमाळ गाठून थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर अवधूतवाडी पोलिसांनी शनिवारी अवघ्या काही तासांत प्रकरणाचा छडा लावून आरोपी संदेश याला ताब्यात घेतले. अनन्या सिंग या नावाने बनावट खाते उघडून त्याने दिल्लीतील नामांकित डॉक्टरशी संपर्क साधला. इंग्रजी माध्यमातून इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या संदेशच्या वडिलांचे निधन झालेले आहे, तर आई वेगळी राहत असल्याने अरुणोदय सोसायटीत एका भाडय़ाच्या घरात राहत आहे. येथूनच त्याने सोशल मीडियावर अनन्या सिंग या नावाने फेसबुक, इन्स्टाग्रामवर बनावट खाते काढले. याच माध्यमातून त्याची डॉक्टरशी ओळख झाली. सुरुवातीला हाय, हेलो झाल्यानंतर डॉक्टरशी जवळीक निर्माण करून संदेशने आपण उद्योगपती असल्याचे सांगितले. काही कालावधीनंतर संदेशने बहिणीचे अपहरण झाल्याचे सांगून डॉक्टरकडे तब्बल दोन कोटींची मागणी केली. दिल्लीतील डॉक्टरांनी थेट यवतमाळ गाठून अनन्या सिंग हिने सांगितल्याप्रमाणे समर नामक तरुणाकडे ही रक्कम सुपूर्द केली. त्यानंतर अनन्याचा मोबाईल बंद झाल्यामुळे डॉक्टरला शंका आली व त्यांनी थेट यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे याबाबत तक्रार दिली.

सायबर सेल व अवधूतवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून लोकेशनवरून संदेश मानकर याचा शोध घेऊन त्याच्या घरातून तब्बल एक कोटी ७८ लाखांची रक्कम व काही मोबाईल आदी साहित्य जप्त केले व त्याला अटक केली. आरोपी संदेश मानकर याला रविवारी पोलिसांनी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ७ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. डॉक्टरकडून रक्कम घेणारा समर कोण आहे, डॉक्टरशी बोलताना महिलेच्या आवाजात बोलणारी व्यक्ती कोण, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यामुळे आरोपी संदेशसोबत या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणाच्या तत्काळ तपासासाठी तपास पथकाला ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.