सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण – आचराची सुकन्या हुमेरा काझी हिने महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना आपल्या दर्जेदार खेळातून मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून देण्यासाठी मोलाचं सहकार्य करून आचरे गावचे नाव लौकिक केले आहे. आचरे काझीवाडीच्या हुमेरा काझीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हुमेराला गावची ओढ पहिल्यापासूनच होती. तिसरीमध्ये असल्यापासूनच तिला क्रिकेट खेळाची आवड निर्माण झाली होती. गावी आल्यावर मोठ्या संघाबरोबर खेळूनही ती जिंकत होती. ऑल राउंडर म्हणून तिने आपली ओळख निर्माण केली होती. याबाबत तिच्याशी फोनवरून संपर्क साधल्यावर तिने आपल्या क्रिकेट कारकिर्दीविषयी माहिती दिली. मुंबई संघातून १६ वर्षांखालील संघातून आपल्या करिअरची सुरुवात झाल्याचे सांगत १९ वर्षांखालील संघात सुरुवातीला तिची सोळावा खेळाडू म्हणून निवड झाली होती. खचून न जाताही संघात संधी मिळताच आपल्या खेळातून संघात स्थान निर्माण केले. त्यानंतर २३ वर्षांखालील संघातून खेळत तिने वरिष्ठ संघात स्थान निर्माण केले. महिला भारतीय संघात दोनवेळा चॅलेंजरमधून खेळल्याचे तिने सांगितले. हुमेराच्या खेळाने प्रभावित होत मुंबई इंडियन्सच्या संघमालक नीता अंबानी यांनी तिला मुंबई इंडियन्समध्ये संधी दिली.