जालना : जिल्हयातील पंधरा महसूल मंडलांमध्ये ६०० मि. मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यापैकी वाघ्रुळ (तालुका-जालना) आणि कुंभारझरी (तालुका -जाफराबाद) या दोन महसूल मंडलांतील पावसाचे प्रमाण ७०० मि.मी. पेक्षा अधिक आहे. राजूर, सेवली, तीर्थपुरी या महसूल मंडलांतील पाऊस ६५० मि. मी. पेक्षा अधिक आहे. तर वाघ्रुळ आणि कुंभारझरी मंडलांत ७०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. १० महसूल मंडलांतील पाऊस ६०० ते ६५० मि. मी. दरम्यान आहे.

जिल्हयात आतापर्यन्त सरासरी ५७३ मि.मी. पावसाची नोंद झालेली असून सर्वाधिक ६५८ मि. मी. पाऊस बदनापूर तालुक्यात झाला आहे सर्वात कमी ५१० मि.मी. पाऊस अंबड तालुक्यातील आहे. जालना, बदनापूर आणि जाफराबाद या तीन तालुक्यांत झालेला पाऊस ६०० मि. मी. पेक्षा अधिक आहे. जिल्हयात आता आतापर्यंत झालेल्या पावसाचे प्रमाण अपेक्षित वार्षिक सरारीच्या तुलनेत ९५ टक्के आहे.

ऑगस्ट महिन्यातील पावसामुळे (१९३ मि. मी.) जिल्हयातील जीवरेखा आणि उर्ध्व दूधना हे दोन प्रकल्प भरून वाहिले आहेत. गल्हाटी प्रकल्पातील साठा ८० टक्क्यांपेक्षा अधिक तर कल्याण गिरिजा आणि जुई मध्यम प्रकल्पांतील साठा ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. याशिवाय २६ लघुसिंचन प्रकल्प पूर्णपणे भरले आहेत.