कोल्हापूर : कोल्हापूर चित्रनगरीत उच्च दर्जाचे तंत्रज्ञान येत्या काळात उभे राहणार आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआय) यांच्या सहकार्याने कोल्हापूरसह महाराष्ट्रातील तरुणांना चित्रपट व्यवसाय, तंत्रज्ञान आणि ऑडिओ-व्हिडिओ यासंबंधीचे प्रशिक्षण सुरू करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी येथे केली. त्यांच्या हस्ते कोल्हापूर चित्रनगरीतील नव्याने बांधण्यात आलेल्या चित्रीकरणासाठी आवश्यक विविध इमारतीचे उद्घाटन झाले. तसेच, निर्मितीनंतर आवश्यक असलेल्या प्रक्रियांसाठीही दुमजली इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले.
मंत्री शेलार म्हणाले, कोल्हापुरात जन्मलेल्या आणि येथे येऊन मराठी सिनेमासाठी कार्य केलेल्या कलाकारांनी मराठी सिनेमाची परंपरा समृद्ध केली असल्याने अशा कलाकारांचे कलात्मक दालन (संग्रहालय) या ठिकाणी उभारण्याची घोषणाही केली.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, कलानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरासाठी ही वास्तू भविष्यात अधिक चांगल्या पद्धतीने उभी राहील. ही चित्रनगरी पाहण्यासाठी लोक तिकीट काढून येतील. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व्यवस्थापकीय संचालक विभीषण चवरे यांनी केले. आमदार राहुल आवाडे, मोरेवाडी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.