भाजपचे पारडे जड ; धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ

गेल्यावेळी अमरिश पटेल यांनी महाविकास आघाडीच्या अभिजीत पाटील यांना पराभूत केले होते.

(संग्रहित छायाचित्र)

संतोष मासोळे, लोकसत्ता

धुळे : विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात महाविकास आघाडी आणि भाजप यांचे संख्याबळ जवळपास समान असले तरी ही निवडणूक चुरशीची होईल की नाही, हा प्रश्न आहे. अमरिश पटेल यांनी काँग्रेसच्या तिकीटावर दोन वेळा ही निवडणूक जिंकली होती. नंतर काँग्रेसचा राजीनामा देऊन वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपकडून ते विजयी झाले. त्यांच्यासारखा या निवडणुकीतील तंत्र कौशल्याचा अनुभव असणारा सक्षम उमेदवार महाविकास आघाडीला शोधावा लागणार आहे.

गेल्यावेळी अमरिश पटेल यांनी महाविकास आघाडीच्या अभिजीत पाटील यांना पराभूत केले होते. भाजपकडून पुन्हा त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या जागेवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी दावा सांगितला आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत शिवसेनेच्या चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव असल्याने ते उमेदवारी करणार नाहीत. पण ही जागा महाविकास आघाडीत सेनेला सुटल्यास त्यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी यांना रिंगणात उतरवले जाऊ शकते. ही जागा काँग्रेसच्या वाटय़ाला आल्यास नंदुरबारचे पालकमंत्री के. सी.पाडवी हे पाठबळ देतील, तो उमेदवार राहण्याची शक्यता आहे.

या मतदार संघातील धुळे जिल्हा परिषद, धुळे महापालिका, दोंडाईचा, शिरपूर नगर परिषद आणि शिंदखेडा नगर पंचायत भाजपच्या ताब्यात आहे. महाविकास आघाडीकडे नंदुरबार जिल्हा परिषद, नंदुरबार नगरपालिका, नवापूर पालिका आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणुकीमुळे शहादा आणि तळोदा नगर पालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष आहेत. तर संख्याबळ महाविकास आघाडीचे अधिक आहे. साक्री आणि धडगाव नगर पंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती आहे. यात प्रत्येकी १९ म्हणजेच ३८ सदस्य होते. पण आता विसर्जित झाल्याने त्यांना मतदानाचा अधिकार नाही. निवडणुकीत एकूण ३९६ मतदार आहेत.

भाजप व महाविकास आघाडीच्या संख्याबळाचा विचार केल्यास उभयतांमध्ये फारसे अंतर नाही. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात घोडेबाजार होण्याची चिन्हे आहेत. त्यात धुळे, नंदुरबारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेते, सदस्य हे आजही अमरिश पटेल यांच्याच संपर्कात आहेत. मागील लढतीत त्याचा प्रत्यय आला होता. त्याची पुनरावृत्ती महाविकास आघाडी कशी टाळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

पक्षीय बलाबल

भाजप : १९९, काँग्रेस : १३६,

राष्ट्रवादी : २०, शिवसेना : २०, एमआयएम : नऊ,

समाजवादी पार्टी : चार, बसप : एक, मनसे : एक, अपक्ष : नऊ.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra mlc election dhule nandurbar local authorities constituency zws

ताज्या बातम्या