नांदेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचा ‘डीएनए’ ओबीसी असल्याचे वक्तव्य गतवर्षी केले होते, तरी मुंबईतील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा कसाबसा समेट झाल्यानंतर त्याचे श्रेयही फडणवीस यांनाच दिले जात असताना आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यात झालेल्या बहुतांश आत्महत्या युती आणि महायुती सरकारच्या राजवटीत झाल्याचे दिसते.

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आणि मुंबईसह ठिकठिकाणची आंदोलने थांबविण्यासाठी शासनाने जरांगे यांची मुख्य मागणी वगळता इतर काही मागण्या मंगळवारी मान्य केल्या व त्यासंबंधीचे निर्णय जारी केले. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणार्‍यांच्या परिवारात नोकरी तसेच प्रलंबित प्रकरणांतील अर्थसाहाय्यासाठी १५ कोटींची तरतूद करण्याचा निर्णय घेतला.

मुंबईतील आंदोलन सुरू होण्याच्या एकदिवस आधी नांदेड तालुक्यातील भानपूर येथील संतोष विक्रम घोगरे (वय २९) या तरुणाने धावत्या रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केली. मृत तरुण मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये मागील काही वर्षांपासून सक्रिय होता. या घटनेला माध्यमांमध्ये ठळक प्रसिद्धी मिळाली. त्याचवेळी नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या ७ वर्षांत ३० जणांनी मृत्यूला कवटाळल्याचे समोर आले.

राज्यात २०१८ ते २०१९ या कालावधीत आधी केवळ भाजपा मग भाजपा-शिवसेना युतीचे सरकार सत्तेमध्ये होते. २०१९ ते जून २०२२ या दरम्यान महाविकास आघाडीचे आणि त्यानंतर भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सत्तेमध्ये आहे. महाविकास आघाडी सरकारचा बहुतांश कार्यकाळ कोरोना महामारीतच गेल्यामुळे वरील काळात सर्वच व्यवहार ठप्प होते. त्यामुळे कुठलीही आंदोलने झाली नाहीत. त्यानंतर शिंदे सरकारच्या काळात मराठा आंदोलनाचा वणवा मराठवाड्यासह अन्य भागांमध्ये पसरला. २०२३ व २०२४ या दोन वर्षांमध्येच नांदेड जिल्ह्यामध्ये २७ जणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

२०१८ साली अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील कचरु कल्याणे आणि याच तालुक्यातील सावरगाव येथील गणपत बाबूराव आबादार या दोघांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली, तेव्हा युतीचे सरकार सत्तेत होते. मराठा आंदोलनात बलिदान देणार्‍यांच्या परिवारास न्याय देण्याच्या संदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांत आत्महत्या करणार्‍यांची नावे समोर आली आहेत. २०२३ साली नांदेड तालुक्यात कोमल तुकाराम बोकारे या मुलीने मराठा समाजाला लवकर आरक्षण द्यावे, माझे बलिदान व्यर्थ जाऊ नये असे एका चिठ्ठीमध्ये नमूद करून आत्महत्या केली होती.

नांदेड जिल्ह्यातील ‘बलिदान वीर’

कचरु कल्याणे (रा.दाभड), शुभम सदाशिव पवार (रा.वडगाव), साईनाथ व्यंकटी टरके (रा.किवळा), सुदर्शन देवराये (रा.कामारी), दाजीबा रामदास कदम (रा.मरळक), अरविंद भोसले (रा.थुगाव), तानाजी बाबूराव जाधव (रा.डौर), तिरुपती ऊर्फ किरण रामचंद्र लांडगे (रा.मांडवी), सतीश मोहनराव मोरे (रा.निळा), साईनाथ प्रकाश कोरडे (रा.तरोडा खु.), उद्धव शिवाजी लोंढे (रा.सांगवी), ओंकार आनंदराव बावणे (रा.भोपाळा), रमेश आनंदा वानखेडे (रा.सावरखेड), सुमीत शरद ढेंबरे (रा.बेरळी), गणपत बाबूराव आबादार (रा.सावरगाव), कोमल तुकाराम बोकारे (रा.सोमेश्वर), अंकुश बाबूराव ढगे (रा.कुंटूर), प्रभाकर नामदेव पवार (रा.खरबी), संतोष विक्रम घोगरे (रा.भानपूर) तसेच बालाजी जाधव, प्रकाश जाधव, भिवजी बेलकर, प्रमोद भुजबळ, आनंदा शिंदे, गजानन देशमुख, राजेश भाकरे, समृद्ध जाधव, प्रभाकर पवार, अमोल शिंदे, श्याम कपाळे इत्यादींची गावांची माहिती मिळू शकली नाही.