जालना : गेली अनेक वर्षे रखडलेला जालना शहराजवळील ड्रायपोर्ट कार्यान्वित करण्याच्या संदर्भात केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आणि विलंबास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध कारवाईची सूचना केली. आमदार अर्जुन खोतकर यांनी शुकवारी दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेऊन ड्रायपोर्ट कार्यान्वित होण्यासाठी विलंब होत असल्याबाबत चर्चा करून त्यांना यासंदर्भात निवेदन दिले.

जेएनपीटीच्या (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) वतीने जालना शहराजवळ उभारण्यात येणाऱ्या ड्रायपोर्टचे भूमिपूजन दहा बारा वर्षांपूर्वी गडकरी यांच्या हस्ते झाले होते. परंतु त्यानंतर हा प्रकल्प कार्यान्वित होण्यात अडचणी येत गेल्या. ड्रायपोर्टमधील मालाची चढ-उतार करण्याचे काम पूर्वी रेल्वेच्या ‘क्वान्कर’ कंपनीस देण्यात आले होते. त्यानंतर हा करार संपुष्टात आल्यावर जेएनपीटी आणि नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेन्ट यांच्यात ‘लॉजिस्टिक पार्क’ विकसित करण्याबाबत करार झाला. नंतर ड्रायपोर्टचा पहिला टप्पा विकसित करण्याचे काम ‘नागपूर मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क’ कडे देण्यात आले.

आमदार खोतकर यांनी सांगितले की गोदाम, रेल्वेमार्ग, वजनकाटा, प्रशासकीय इमारत, वीज, जालना-छत्रपतीनगर मार्गास जोडणारा रस्ता यासह अन्य कामे पूर्ण झालेली आहेत. परंतु ‘ड्रायपोर्ट’ मधील कामांसाठी लागणारी यंत्रणा अद्याप कार्यान्वित झाली नसल्याचे आपण गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश दिले.

पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा नवीन द्रुतगती महामार्ग जालना शहराजवळील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गास जोडावा, अशी मागणीही गडकरी यांच्याकडे केली. त्याचप्रमाणे जालना विधानसभा मतदारसंघातील प्रमुख सात रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा करण्याची मागणी गडकरी यांच्याकडे करण्यात आल्याचे खोतकर यांनी सांगितले.