अलिबाग: अलिबाग मुंबई पुणे दृतगती मार्गावर झालेल्या भातान बोगद्यावर झालेल्या अपघातात, सात ते आठ वाहने एकमेकांना धडकली, यात पोलीसांच्या वाहनांचा समावेश आहे. या अपघातात दहा प्रवाश्यांसह २० ते २२ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. जखमींना नवीमुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दृतगती मार्गावर भातान बोगद्यात पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर एक कंटेनर बोगद्यात आडवा झाला होता. आयआरबी यंत्रणा आणि पोलीस यांच्या मार्फत हा कंटेनर काढण्याचे काम सुरु होते. यावेळी पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने या वाहनांना धडक दिली. त्यानंतर टेम्पोच्या मागून येणारी वाहने एकमेकांवर आदळली. यात मुंबई पोलीसांच्या वाहनांचा समावेश आहे. सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मुंबई, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर येथून पकडण्यात आलेल्या बांग्लादेशी घुसखोरांना मुंबई पोलीसांचा ताफा पुण्याच्या दिशेने निघाला होता. या ताफ्यातील वाहनांचा या अपघातात समावेश होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, बचाव पथक, वाहतूक पोलीस घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलीस प्रशासनाने इतर गाड्या बोलवून कैद्यांना पुण्याच्या दिशेने रवाना केले. अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी घटना स्थळाला भेट देऊन मदत व बचाव कार्याचा आढावा घेतला.