महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये कोण सत्ता स्थापन करणार यावरुन युतीमधील भाजपा आणि शिवसेनेमध्ये मागील अनेक दिवासांपासून रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना-भाजपामध्ये ५०-५० फॉर्म्युल्यावरुन वाद सुरु आहे. दररोज या दोन्ही पक्षांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. अशातच बुधवारी शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये “शातं, थंड डोक्याने महाराष्ट्राच्या हिताचा विचार करुन काही निर्णय घ्यावे लागतील त्यासाठी उद्धव ठाकरे समर्थ आहेत. ठरल्याप्रमाणे सगळं घडलं तर येणार सरकार स्थिर असेल,” अशी काहीशी मावळ भुमिका घेतली. त्यावरुनच आता राष्ट्रवादीने शिवसेनेला सुनावले आहे. ‘शिवसेनेचा वाघ बदलून शेळी करायला पाहीजे’, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या रेखा फड यांनी लगावला आहे.

आणखी वाचा- ‘दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही’

बुधवारी संध्याकाळी राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये “युतीत राहण्यातच राज्याचं भलं आहे पण योग्य तो सन्मान राखाला जावा” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावरुन राऊत यांनी मवाळ भूमिका घेतल्याची चर्चा राकीय वर्तुळामध्ये रंगली. यावरुनच राष्ट्रवादीच्या नेत्या फड यांनी ट्विटवरुन शिवसेनेवर टिका केली. “अखेर सत्तेसाठी शिवसेनेने भाजपापुढे नांगी टाकलीच. शिवसेनेचा वाघ थंड झाला. आता वेळ आलीय शिवसेनेचा वाघ बदलून शेळी करायला पाहीजे, इतकी लाचारी, चला आता पुढील पाच वर्ष विकास कमी आणि यांची नौटंकी पाहायला महाराष्ट्रातील जनतेने तयार रहा!,” असे ट्विट फड यांनी केले आहे. या ट्विटमध्ये फड यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जयंत पाटील यांना टॅग केले आहे.

आणखी वाचा- …म्हणून उदयनराजेंचा पराभव, सातऱ्याच्या खासदाराने सांगितले कारण

दरम्यान, बुधवारी भाजपाकडून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचंच नाव पुढे करण्यात आलं होतं. त्यानंतर शिवसेना नरमली. राज्यासाठी युती आवश्यक आहे आणि समसमान वाटपासाठी शिवसेना आग्रही नाही अशा आशयाचं वृत्त सर्वत्र पसरलं होतं. यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे. “शिवसेना नरमली, माघार घेतली, तडजोड केली, समसमान पदांची मागणी सोडली वगैर अशा पुड्या सुटू लागल्या आहेत. ये पब्लिक है, सब जानती है. जे ठरले होते त्या प्रमाणेच होईल,” असं ट्विट राऊत यांनी केलं आहे.