करोनाकाळात माता-पित्याचे छत्र हरपलेल्यासाठी आधार;

यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना

पालघर : करोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृतिदल गठित करण्यात आली आहे.

करोनाचा विषाणूचा वाढलेला संसर्ग आणि त्यामुळे बाधित व्यक्तींचे व मृत्यूचे वाढलेले प्रमाण विचारात घेता, त्याचा बालकांच्या जीवनावरदेखील गंभीर परिणाम होत आहे. काही प्रसंगी करोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या मुलांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करीसारख्या गुन्ह्यंना बळी पडण्याची शक्यता जास्त आहे.

सर्वोच्च न्यायालय येथील न्यायाधीशांच्या बाल न्याय समितीमार्फत (जे जे कमिटी) कोविड-१९ या आजाराच्या अनुषंगाने राज्यातील बालकांची काळजी व संरक्षणासंबंधी कार्य करणाऱ्या संस्थांबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये करोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित मुद्दय़ांच्या अनुषंगाने व इतर मुद्दय़ांबाबत जिल्हा स्तरावर कृतिदल गठित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्देशानुसार जिल्हास्तरावर कृतीदल जिल्हाधिकारी  यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली आहे. या कृतिदलामध्ये पालघर जिल्ह्यच्या क्षेत्रातील महानगरपालिकांचे आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक (ग्रामीण), जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य म्हणून तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे या कृतीदलाचे सदस्य सचिव आहेत.

सूचना, संपर्क व यंत्रणा

चाइल्ड हेल्प लाइन क्र. १०९८चा माहिती फलक कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णालयांत दर्शनी भागात लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. करोनाच्या पाश्र्वभूमीवर कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या बालगृहे व निरीक्षण गृहांकरिता उपचार पुरविण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात येणार आहे. ज्या बालकांच्या दोन्ही पालकांना करोना आजाराचा संसर्ग झाला आहे अशा बालकांची माहिती किंवा एखादी समस्या उद्भवल्यास तातडीने चाइल्ड लाइन क्रमांक १०९८, जिल्हा कृती दल समन्वयक (९८९०८५३२८२), बालकल्याण समिती (७०२०३२२४११), हेल्पलाइन क्रमांक (८३०८९९२२२२/ ७४०००१५५१८) या संपर्क क्रमांकावर साधण्याचे जिल्ह्यतील सर्व कोविड रुग्णालय व मदत केंद्रांना सूचित करण्यात आले आहे.