कराड : आजअखेर साडेपाच महिने झालेतरी पाऊस कोसळतच असून, त्यामुळे जसे खरीप हंगामाचे गणित बिघडले, तशीच तऱ्हा रब्बी हंगामाची होत आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी सातारा जिल्ह्यात रब्बीच्या केवळ १५ टक्के पेरण्याच झाल्या असून, महाबळेश्वर तालुक्यात पेरणीला सुरुवातच झालेली नाही.
सातारा जिल्ह्यात रब्बी हंगामाचे एकूण क्षेत्र २ लाख १३ हजार ९९७ हेक्टर आहे. सध्या त्यापैकी ३२ हजार ७८६ हेक्टरवर पेरणी झाली असून, त्यात मक्याची पेरणी सर्वाधिक ३७ टक्के आहे. शेतशिवारात पेरण्यांची लगबग दिसत असलीतरी मान्सुनोत्तर पावसाने पेरण्यांची कामे खोळंबत आहेत. अनेक ठिकाणी ऊसतोडणीही ठप्प होताना, पाल्याच्या झोपड्यात वास्तव्य करणाऱ्या ऊसतोड मजुरांचे प्रचंड हाल होत असल्याचे विदारक चित्र आहे. सध्या लांबलेल्या खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग व भात पिकांची काढणी सुरू आहे.
आवर्षणग्रस्त फलटण, माण, खटाव, कोरेगाव, ‘उत्तर कराड’मध्ये रब्बीच्या पेरण्यांनी जोर धरला आहे. सातारा जिल्ह्यात रब्बीचा पेरा १५ टक्केच आहे. त्यात ज्वारी २७ हजार ५०९, गहू १५६, मका ३ हजार ७५७, हरभरा १ हजार ८८, इतर कडधान्य २७४ हेक्टर असे मिळून ३२ हजार ७८६ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. सातारा तालुक्यात रब्बी हंगामात ज्वारी ४ हजार २३४, गहू २५, मका ४७, हरभरा १५५ हेक्टर अशा ४ हजार ४७३ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. जावलीत ज्वारी ४९५ हेक्टर. पाटण तालुक्यात ज्वारी २ हजार ९०६, गहू ६५, मका ६४, हरभरा ५०६ हेक्टर अशा ३ हजार ५४८ हेक्टरवर तर, कराड तालुक्यात ज्वारी ७९४, हरभरा २४ अशा ८२० हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.
कोरेगाव तालुक्यात ज्वारी ६ हजार १४५, गहू ३०, हरभरा १५५ असे मिळून ६ हजार ५६१ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. खटावमध्ये ज्वारी २ हजार २६, मका ४४५, हरभरा ४१ असे मिळून २ हजार ५१२, माण तालुक्यात ज्वारी ४ हजार २८९, गहू ७, मका १ हजार २३७, हरभरा ५८ असे मिळून ५ हजार ५९१ हेक्टर. फलटण तालुक्यात ज्वारी ४ हजार ३३७, गहू ७, मका १ हजार ९६२, हरभरा २९ हेक्टर असे मिळून ६ हजार ३३९ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. खंडाळा तालुक्यात ज्वारी ३१६, हेक्टर. वाई तालुक्यात ज्वारी १ हजार ९६९, गहू २२ हेक्टर अशा २ हजार १२८ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
