रविवारी मालेगावच्या एमएसजी (मसगा) कॉलेजच्या मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सावकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांना चांगलंच सुनावलं. स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत आहे. त्यांचा अपमान पटणारा नाही. आम्ही आमच्या दैवतांचा अपमान सहन करणार नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केलं आहे. सावकरकरांचा इतकाच अभिमान असेल, तर महाविकास आघाडीतून बाहेर पडून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले. टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – “आपल्या बापाच्या विचारांशी गद्दारी करणारे…”, मालेगावातील सभेवरून रामदास कदमांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र!
काय म्हणाले रामदास कदम?
“उद्धव ठाकरेंना सावरकरांबद्दल अभिमान असेल, तर ते काँग्रेसला सोडत का नाही? केवळ इशारे काय देताय? तुम्ही शिवसेनाप्रमुखांचे चिरंजीव आहात ना, मग घाव दोन तुकडे करा. हिंमत असेल तर महविकास आघाडीतून बाहेर पडा”, असे आव्हान रामदास कदम यांनी दिली.
“बाळासाहेब उद्धव ठाकरेंना शाप देत असतील”
“उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी सोडू शकत नाही. एवढी हिंमत त्यांच्यात नाही. त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी महाराष्ट्रात पुन्हा जिवंत करायची आहे. खरं तर २०१४ मध्येच काँग्रेस-राष्ट्रवादी महाराष्ट्रातून संपली होती. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी दोन्ही पक्षांना जिवंत केलं. उद्धव ठाकरेंच्या अशा कृतीमुळे बाळासाहेबांचा आत्मा दुखावला गेला आहे. त्यांच्या आत्मा तळपळत असेल आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना शाप देत असतील”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
हेही वाचा – “…की घरी बसून अंडी उबवणार?” सावरकरांच्या अपमानावरून राहुल गांधींना इशारा देणाऱ्या उद्धव ठाकरेंना मनसेचा टोला
उद्धव ठाकरेंच्याच कपाळावर गद्दारीचा शिक्का
“गद्दारीचा शिक्का खरं तर उद्धव ठाकरे यांच्या कपाळावर बसला आहे, तो आता कधीही पुसला जाणार नाही. भाड्याची माणसं आणून ते बेंबीच्या देठापासून ओरडले, तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. भगवा झेंडा हातात घेण्याचा नैतिक अधिकार आता उद्धव ठाकरेंना नाही, तो अधिकार आता फक्त आम्हाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता कितीही ओरडले, तरी जनता त्यांच्या पाठीशी उभी राहणार नाही”, असेही ते म्हणतात.