रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील सावर्डे वहाळ फाटा येथील वीज पोल चोरी प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे.पोलिसांनी केलेल्या या कारवाईत तब्बल १ कोटी ३४ लाख २४ हजार ५८९ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वहाळ फाटा येथील मोकळ्या जागेत ठेवलेले महावितरण कंपनीचे वीज पोल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५६/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सावर्डे महावितरण सब स्टेशनजवळ सचिन वारे यांच्या वहाळ फाटा येथील मोकळ्या जागेत ठेवलेले ७४,८४,०९८/- रु. किमतीचे ४५० लोखंडी इलेक्ट्रीक पोल चोरीला गेले होते.

या प्रकरणी फिर्यादी अखिलेष कुमार लालताप्रसाद प्रजापती (वय ४७) मूळ रा. विरार, पालघर, सध्या रा. भरणेनाका, ता. खेड, जि. रत्नागिरी यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या संमतीशिवाय हे ४५० लोखंडी इलेक्ट्रीक पोल ट्रेलरमधून चोरून नेण्यात आले होते. फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.

तपासाच्या वेळी पोलीसांनी या गुन्ह्यात वापरलेल्या तीन ट्रेलर्सचा शोध घेतला. त्यापैकी दोन ट्रेलर्स कोलाड, जिल्हा रायगड व एक ट्रेलर कामथे येथे मिळून आला. या ट्रेलर्सवरील तीन चालकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये सुरेश नंदलाल खारोल (वय २४) रा. जोताया, जि. अजमेर, राजस्थान, पिंटु भना (वय २२) रा. कैसरपुरा, जि. अजमेर, राजस्थान आणि पुखराज श्रीकिशन भील (वय २२) रा. सुरजपुरा, जि. अजमेर, राजस्थान यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेले ४५० लोखंडी इलेक्ट्रीक पोल आणि गुन्ह्यात वापरलेले तीनही ट्रेलर जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी ३४ लाख २४ हजार ५८९ रु. इतकी आहे. अटक केलेल्या तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना १० जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.