शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. ४० बंडखोर आमदारांची परतण्याची शक्यता मावळल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना नव्याने पक्ष बळकट करण्याचे आवाहन केले आहे. तसेच १६ बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. असे असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या गटानेदेखील आक्रमक भूमिका घेऊन न्यायालयात धाव घेतली असून आमदारांच्या निलंबनाची मागणी आणि गटनेता बदलण्याला विरोध दर्शविला आहे. शिंदे गटाने दाखल केलेल्या या याचिकेवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> नरहरी झिरवळ यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव अवैध? शिवसेनेच्या वकिलांनी सांगितली कायदेशीर बाजू, म्हणाले…

पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेने १६ बंडखोर आमदारांचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. याच मागणीची दखल घेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी या १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली असून कारवाई का करु नये याबाबत उत्तर देण्यास सांगितले आहे. तसेच शिवसेनेने आपला गटनेता बदलून एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजय चौधरी यांना नियुक्त केले आहे. याविरोधातच शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच याचिका दाखल करत या दोन्ही निर्णयांना विरोध केला आहे. याबाबत उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळ आता न्यायालय काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा >>> “बंड जास्त दिवस राहणार नाही, कारण…”; चंद्रकांत खैरेंचा बंडखोर आमदारांना निर्वाणीचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी जे गेले ते परत निवडून येणार नाहीत, असे म्हणत बंडखोरांनी परत मुंबईत येऊन दाखवावं असे, आव्हान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. तसेच बरं झालं घाण गेली म्हणत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अपक्ष आमदारांना परत पक्षात घेणार नसल्याचे संकेत दिले. उद्धव ठाकरे यांनीदेखील पुन्हा एकदा जोमाने कामाला लागा. नव्याने पक्षाची बांधणी करा, असे शिवसैनिकांना आवाहन केले आहे. तर दुसरीकडे आम्ही अजूनही शिवसेनेतच असून दुसऱ्या कोणत्याही पक्षात आम्ही जाणार नाही. आम्ही हे सारं शिवसेनेला संपवण्यासाठी नव्हे तर पक्ष वाढवण्यासाठी करत आहोत, असा दावा शिंदे गटाकडून केला जातोय.