सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करताना दारु तसंच राजकीय नेत्यंसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केल्याने कीर्तनकार बंडातात्या कराडकर चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत असून राष्ट्रवादीकडून राज्यभरात आंदोलन केलं जात आहे. सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतलं आहे. त्यांच्या या वक्तव्याप्रकरणी राज्य महिला आयोगानेही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना चाकणकर म्हणाल्या, वारकरी सांप्रदाय हा महाराष्ट्रात प्रबोधनाचं काम करतो. त्यामुळे वारकरी सांप्रदायातल्या व्यक्तीने आपलं म्हणणं मांडत असताना किंवा एखादी गोष्ट पटवून देत असताना महिलांचा अशा पद्धतीने अपमान करणं हे महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या जनतेला पटलेलं नाही. त्यामुळे जरी त्यांनी माफी मागितली असली तरी अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी करणं हे निंदनीय होतं. समाजात प्रबोधन करणाऱ्या व्यक्तीने महिलांबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं ही प्रथा पडू नये आणि केवळ बंडातात्या कराडकरच नाही तर समाजातल्या कोणत्याही व्यक्तीने महिलांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारी अशी जर विधानं केली, तर निश्चितच इथून पुढे त्यावर कडक कारवाई केली जाईल.

आणखी वाचा – ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात

दरम्यान, या वक्तव्यामुळे बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महिला आयोगाने बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याची दखल घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास सांगितलं होतं. यानंतर पोलिसांच्या कारवाईला वेग आला होता. गुरुवारी पोलिसांनी बंडातात्यांच्या दोन्ही मठांवर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यानंतर शुक्रवारी सकाळपासून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आणि मठातून ताब्यात घेतलं. साताऱ्यातील फलटण करवडी येथून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्यांना साताऱ्याकडे नेलं जाणार आहे.

हेही वाचा – कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा; बंडातात्या कराडकरांचं जाहीर आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं काय म्हणाले होते बंडातात्या कराडकर ?

बंडातात्या कराडकर यांनी यावेळी नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचं सांगत काहीजणांची नावंदेखील घेतली. पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? असंही ते पत्रकारांना म्हणाले. तसंच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केला. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असं आव्हानच त्यांनी पत्रकारांना दिलं. तसंच आपण नावं घेतली आहेत त्यांनी पुरावा मागितलं तर सिद्ध करु शकतो असंही म्हणाले. सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटं बोलत आहेत सांगावं असं आव्हानही त्यांनी दिलं.