सांगली : महाराष्ट्राच्या सुसंकृत राजकारणाला संपविण्यासाठी वाचाळवीरांची फौज राज्याच्या नेतृत्वाने निर्माण केली आहे. ही वाचाळवीरांची फौजच त्यांच्या अधोगतीला कारण ठरेल असे इशारा महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी सोमवारी सांगलीत केले.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यावर अश्लाघ्य टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि पडळकर यांचा निषेध करण्यासाठी सोमवारी सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाहीर अण्णाभाउ साठे यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून स्टेशन चौकातील स्व.राजारामबापू पुतळ्याजवळ आल्यानंतर सभेत रूपांतर झाले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस खा. धैर्यशील मोहिते, खा. डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, आ. विश्वजित कदम, उत्तम जानकर, महेबूब शेख, जिल्हा बॅेकेचे संचालक दिलीप पाटील, काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील माजी आमदार विलासराव जगताप, अजितराव घोरपडे आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

आ. रोहित पवार म्हणाले, काही दिवसापुर्वी एका नेत्याची बेनामी जाहिरात पाहिली. जाहिरात देउन नटसम्राट, नटवरलाल होता येईल, मात्र, लेाकनेता होउ शकत नाही अशी त्यांनी अप्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मोठ्या नेत्यावर बोलण्यासाठी छोट्या नेत्यांचा वापर केला जात आहे.

खा. लंके म्हणाले, सरकारकडे विकासाचा कोणताच अजेंडा नाही. यामुळे जाती-जातीत व समाजात तेढ निर्माण करण्यासाठी वाचाळवीरांचा वापर करण्यात येत आहे. अशा वाचाळविरांना केवळ समज देउन चालणार नाही तर त्यांना शिक्षा देण्याची ही वेळ आहे.

आमदार टोपे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ समज देउन चालणार नाही, तर कान उपटण्याची वेळ आली आहे असे सांगितले, तर डॉ. कोल्हे यांनी ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोसह जाहिराती छापल्या त्या फोटोसमोर सामान्यांना न्याय देण्याची दानत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी. मुख्यमंत्र्यांनी शिबीरामध्ये सुसंस्कृतपणाच्या गप्पा मारण्यापेक्षा धडक मोहिम राबवावी.

यावेळी आमदार आव्हाड यांनी राज्यात राजकारणाने नीचत्तोम पातळी गाठल्याचा आरोप करत शनिवारवाड्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर शिंतोडे उडविले, तसाच प्रकार आज मोठ्या नेत्याबद्दल सुरू असून यामुळे महाराष्ट्र पेटेल हे लक्षात घ्यावे. विधीमंडळाचे वैभव ज्यांना माहित नाही अशा लोकांना तिथे आणून बसविले आहे. लाडकी बहीण योजना आणणार्या मुख्यमंत्री व दोन्ही मुख्यमंत्र्यांनी मातृत्वाचा अवमान करणार्यावर काय कारवाई करणार हे महाराष्ट्राला सांगावे असे आवाहन केले.

यावेळी खा. विशाल पाटील यांनीही जयंत पाटील यांच्याकडे राजकीय शत्रू म्हणून जरी आम्ही पाहत असलो तरी शत्रूच्या आईबद्दल वाईट ऐकून घेण्याचे आमचे संस्कार नाहीत. अध्यक्ष आ. शिंदे यांनी यापुढे अशा वाचाळवीरांना सडेतोड उत्तर देण्यास आमचा पक्ष सक्षम आहे. यापुढे असा प्रकार घडल्यास आमचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. जाती-जातीत भांडणे लावून सत्ता मिळवणे हेच यांचे उदिष्ट आहे. यापुढे मतविभाजनाचा यांना फायदा मिळवून देणार नाही. आता सुरूवात तुम्ही केली आहे, मात्र याचा शेवट आम्ही करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.