उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री म्हणून कामाचं कौतुक
वाई:उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा फायदा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेच्या आमदारांना कार्यकर्त्यांना त्रास दिला.संजय राऊत हे शिवसेना वाढवण्यासाठी नव्हतेच तर ते शिवसेना संपवण्यासाठी होते अशी टीका कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी राऊत यांच्यावर केली.
एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभागी झालेले कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आज साताऱ्यात आले. त्यांचे मतदार संघात मोठे स्वागत करण्यात आले. त्यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.तुम्ही बारामतीला किती निधी दिला ते जाहीर करावे. राज्याचा मंत्री किंवा अर्थमंत्री पक्षपात करणारा नसला पाहिजे तुम्ही जर दुजाभाव करायला लागला तर शंभर टक्के तुम्ही अर्थमंत्री व्हायच्या लायकीचे नव्हता असा टोलाही त्यांनी लगावला.

संजय राऊत यांनी आमदारांचं हे प्रकरण प्रेमानं हाताळलं असतं तर जे घडलं तसं घडलंच नसतं, असं म्हणत महेश शिंदे यांनी बंडखोरीनंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या करोना काळातील कामाचं कौतुक केलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून करोनाच्या लाटेत उत्कृष्ठ काम केलं, असंही ते म्हणाले. उद्धव यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

अजित पवारांनी अर्थमंत्री असताना राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी दिला. १५ दिवस राज्यानं जे पाहिलं तो राष्ट्रवादीने शिवसेनेच्या आमदारांना दोन वर्षात दिलेल्या सापत्न वागणुकीचा परिणाम होता. राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा फायदा घेऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला असा आरोपही शिंदे यांनी केला.

सातारा औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) खरे खंडणी बहाद्दर येथील कामगार नेते, माजी आमदार आहेत असे शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता आरोप केला. तेच स्वतःच्या युनियन करून उद्योजकांना धमकावत असतात. विनाकारण साताऱ्याच्या राजघराण्याला बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला हे आता थांबवायचं आहे. ज्यांनी आजपर्यंत युनियन टाकून उद्योग धंदे बुडवायचा प्रयत्न केला. त्या उद्योजकांना आम्ही ताकद देऊन उद्योग धंदे वाढवणार आहोत. उद्योजकांना जर तुम्ही पैसे काढण्याचे ठिकाण समजत असाल, तर महेश शिंदे इथून पुढे तुम्हाला शंभर टक्के आडवा आलेला असेल असा इशारा त्यांनी शशिकांत शिंदेंचा नामोल्लेख टाळून केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडीचा विकास आपण रोज बघत होतो. रोज सकाळी उठून संजय राऊत भजन कीर्तन सुरू करायचे आणि जनतेचे डोक आऊट व्हायचं. किमान आमच्या माजी प्रवक्त्यांची बडबड आंम्ही थांबवली म्हणून महाराष्ट्राची जनता आम्हाला दुवा देईल.संजय राऊत हे शिवसेना वाढवण्यासाठी नव्हे ते शिवसेना संपवण्यासाठी होते याचा पुनरुच्चार त्यांनी केला.जरंडे श्वर साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.