भाजपा व शिंदे गटाच्या सरकार स्थापनेनंतर शिवसेनेतील बंडखोर आमदार वादात सापडले आहेत. प्रकाश सुर्वे यांनी ठोकशाहीची भाषा केल्याने, तर संतोष बांगर यांनी मारहाण केल्यानंतर विरोधकांनी शिंदे गटाच्या नेत्यांच्या डोक्यात सत्ता गेल्याचा आरोप केलाय. याबाबत विचारलं असता राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराजे देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते मंगळवारी (१६ ऑगस्ट) मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

शंभुराजे देसाई म्हणाले, “आम्ही ५१ आमदार सत्ता डोक्यात जाणाऱ्यांपैकी नाही. आम्ही चार लाख सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधी आहोत. ज्या लोकांनी निवडून दिलं आहे त्या लोकांच्या हितासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी काम करतात. काही लोकप्रतिनिधींची पद्धत शांत, संयमी असते, तर काहींची पद्धत थोडीशी आक्रमक असते.”

“असं असलं तरी आम्ही सर्व सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करणाऱ्यांपैकी आहोत. आमच्या कुणाच्याही डोक्यात सत्ता जाणार नाही. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही शिवसैनिक आहोत. त्याच शिकवणीप्रमाणे आमचं कामकाज राहील,” असं शंभुराजे देसाई यांनी सांगितलं.

“कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठी ठोकशाहीचं वक्तव्य”

शंभुराजे देसाई म्हणाले, “आमदार प्रकाश सुर्वे यांची क्लिप मी रात्री टीव्हीवर पाहिली. तो प्रतिक्रियेचा भाग असू शकतो. कारण ते स्वतः असं आक्रमकपणे बोलतील असं मला वाटत नाही. मात्र, या वक्तव्यापूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांवर, सहकाऱ्यांवर, पदाधिकाऱ्यांवर कुणी दमदाटी केली असेल, दादागिरी केली असेल, मारहाण करण्याचा प्रयत्न केला असेल तर या कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठी असं सांगितलं असावं असं मला वाटतं.”

“मला त्याची पूर्ण माहिती नाही. संबंधित यंत्रणेकडून मी सविस्तर माहिती घेतो आणि याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आम्ही चर्चा करू,” असं शंभुराजे देसाई यांनी सांगितलं.

“…म्हणून कदाचित संतोष बांगर चिडले असतील”

आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या मारहाणीवर बोलताना देसाई म्हणाले, “संतोष बांगर यांनी केलेली मारहाण अनावधानाने झाली असेल. कँटिनने कामगारांना सकाळी काय द्यावं, संध्याकाळी काय द्यावं हे शासनाने ठरवून दिलं होतं. आमदार संतोष बांगर तेथे गेले आणि कामगारांना मिळणारं जेवण पाहिलं. तेव्हा कँटिननला निश्चित करून दिलेल्या जेवणाप्रमाणे जेवण नसल्याचं लक्षात आलं. म्हणून कदाचित ते चिडले असतील. परंतु ठेकेदाराने नियमांचं पालन केलं नाही म्हणून ते तसं वागले असतील.”

हेही वाचा : “आमच्या पक्षात फूट पडली तेव्हा चिन्ह…”, आरपीआयचं उदाहरण देत शिवसेनेबाबत रामदास आठवलेंचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“रागाच्या भरात हे घडलं असेल”

“असं असलं तरी हात उगारणं योग्य नाही. त्यांनी त्यांना समजून सांगायला हवं होतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्याची तक्रार करायला पाहिजे होती. मात्र, रागाच्या भरात हे घडलं असेल,” असंही देसाई यांनी नमूद केलं.