Sharad Pawar on Donald Trump: इराण-इस्रायल युद्धाबाबत अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थीचा दावा केल्यानंतर मोठी चर्चा सुरू झाली आहे. भारत व पाकिस्तान यांच्यातील संघर्षातही डोनाल्ड ट्रम्प यांनी अशाच प्रकारे मध्यस्थीचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यानुसारच भूमिका घेतल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. तसेच, शरद पवारच पंतप्रधान नरेंद्र मोदींना इस्रायलला घेऊन गेल होते, असाही दावा केला जात असताना त्यावर खुद्द शरद पवारांनीच उत्तर दिलं आहे.
कोल्हापूर दौऱ्यादरम्यान शरद पवारांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला श्रेयवाद आणि भारताची त्यावरची भूमिका याबाबत भाष्य केलं आहे.
“डोनाल्ड ट्रम्प कुणाशी बोलतात माहिती नाही”
“इस्रायल व इराणबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी येऊन घोषणा केली की जे काही निर्णय झाले ते मी घेतले. म्हणजे कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नसताना ते सगळं श्रेय स्वत: घेतात. कुणाशी बोलतात माहिती नाही. त्यामुळे त्यांची विधानं अस्वस्थ करणारी आहेत. युरोपातही अनेक देशांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वर्तनाबाबत नाराजी आहे. सौदी अरेबिया, कतार, अफगाणिस्तान, इराण या सगळ्या भागात अमेरिकेच्या भूमिकेबाबत नाराजी आहे. आपण शक्तिशाली आहोत म्हणून छोट्या देशांवर आपलं मत लादणं हे योग्य नाही. त्यामुळे भारतानं यात स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे”, असं शरद पवार म्हणाले.
“भारताबाबत गैरसमज तयार होत आहेत”
दरम्यान, इस्रायल व इराण यांच्यातील संघर्षात भारताकडून स्पष्टपणे कुणाची बाजू घेतली जात नसल्यामुळे भराताबाबत गैरसमज वाढत असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. “स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी या सगळ्यांनी या आखाती देशातील लोकांच्या भावना नजरेसमोर ठेवून त्यांना नेहमीच पाठिंबा दिला होता. आपण इस्रायलशी शेतीबाबत संबंध ठेवले. पण राजकीय संबंध आपण ठेवले नव्हते. पहिल्यांदाच भारत सरकार याबाबत स्पष्ट भूमिका घेत नसल्याचं दिसत आहे. त्याचा परिणाम हा सबंध आखाती देशांमध्ये भारताबद्दल गैरसमज तयार होत आहेत. ही गोष्ट चांगली नाही”, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार..नरेंद्र मोदी..आणि इस्रायल दौरा!
यावेळी बोलताना शरद पवारांनी नरेंद्र मोदींसोबत केलेल्या इस्रायल दौऱ्यावर भाष्य केलं. “मी कृषीमंत्री असताना माझं इस्रायलला जायचं ठरलं. माझा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मला नरेंद्र मोदींचा फोन आला. ते तेव्हा मुख्यमंत्री होते. ते म्हणाले की इस्रायलमधील शेती व पाण्याची बचत यासंदर्भातील त्यांचं काम बघण्याची मला इच्छा आहे. तेव्हा त्या देशात जाण्यासाठी आपल्याकडे व्हिसा मिळत नसे. मोदींनी मला सांगितलं की तुम्ही जात आहात तर तुमच्या शिष्टमंडळात माझाही समावेश करा. मी हरकत नाही असं सांगितलं. मग मी पंतप्रधानांशी बोललो. त्यांनीही होकार दिला. तेव्हा माझ्याबरोबर नरेंद्र मोदी, तेव्हाच्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, हरियाणाचे मुख्यमंत्री असे अनेकजण होते”, असं शरद पवारांनी सांगितलं.