राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीकडून आज पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. यावेळी मुंबईतील बलार्ड इस्टेट येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले आणि त्यांनी ईडी विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शरद पवार यांच्या पत्नी आणि रोहित पवार यांच्या आजी प्रतिभा पवारही आल्या असल्याचे दिसले. त्यांच्यासमवेत सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे, रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार आणि पत्नी कुंती पवारही राष्ट्रवादीच्या कार्यालयात आल्या होत्या. रोहित पवार यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व कुटुंबिय प्रदेश कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले.

उद्धव ठाकरे रायगड दौऱ्यामुळे पक्षसंघटनेला उभारी मिळेल का?

शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि इतर कुटुंबिय हे राजकारणापासून लांब राहत आले आहेत. प्रतिभा पवार या क्वचितच एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात. मागे शरद पवार यांच्या आत्मचरित्राचा विस्तारीत भाग प्रकाशित होत असताना त्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपस्थित होत्या. त्यांच्यासमोरच शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानंतर जवळपास दोन तास कार्यकर्त्यांनी ठिय्या मारल्यानंतर त्या शरद पवार यांच्याबाजूला बसून होत्या. आज रोहित पवार यांच्यासाठी त्या पक्ष कार्यालयात उपस्थित राहिल्यामुळे पवार कुटुंबिय रोहित पवार यांच्या पाठिशी ताकदीने उभे असल्याचे दिसले.

रोहित पवार ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, “ईडीकडून करण्यात येत असलेल्या कारवाईला संपूर्ण सहकार्य करत आहे. ईडी अधिकाऱ्यांविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करू नये. त्यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य करू नये. अधिकारी त्यांचं काम करत आहेत. स्वाभिमानी महाराष्ट्राचा नागरिक म्हणून ईडी किंवा इतर तपास यंत्रणा जी माहिती मागेल, ती देण्यासाठी मी तयार आहे.”

“मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे टोप्या घालण्याचा प्रकार, कारण…”; उद्धव ठाकरेंची टीका

रोहित पवार पुढे म्हणाले की, “मी व्यवसायात कोणतीही चुकीची गोष्ट केलेली नाही. मी राजकारणात येण्याआधी व्यवसाय करत होतो. नंतर राजकारणात आलो. अनेक लोक आधी राजकारणात येतात आणि नंतर व्यवसाय सुरू करतात. पण अशा नेत्यांना आजवर कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागलेला नाही. मी व्यवसाय करत असताना अनेक अडचणी आल्या, तरीदेखील मी संघर्ष केला. आज राजकारणातही संघर्ष करत आहे. इथून पुढेही मला संघर्ष करावा लागणार आहे.”

“योगायोग बघा पुढील काही महिन्यात निवडणुका होणार आहेत. निवडणुकांचे टायमिंग पाहून कारवाया सुरू झालेल्या आहेत का? निवडणुकीच्या तोंडावर कारवाई सुरू असल्यामुळे लोकांच्या मानात संभ्रम निर्माण झालेला आहे. हा लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे”, अशीही टीका रोहित पवार यांनी केली.