सातारा : शासनाने शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे आमच्या पक्षाच्या वतीने शासनाचा निषेध म्हणून राज्यभर काळी दिवाळी साजरी करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात सांगीतले.

महायुती सरकारने बळीराजाच्या डोळ्यात धूळफेक करून शेतकर्‍यांनाही फसवी मदत दिली आहे. त्याचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (दि १७) निषेधात्मक काळी दिवाळी, लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या वेळी शशिकांत शिंदे पत्रकारांशी बोलत होते. या वेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रामध्ये मे महिन्यापासून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जोरदार अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सर्वत्र बळीराजा अडचणीत आहे. ज्यांच्या जमिनी खरडून आणि वाहून गेल्या आहेत, त्यांच्यासाठी जाहीर केलेले पॅकेज ही फसवणूक आहे. एकूणच शासनाने राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. यासाठी आम्ही लाक्षणिक उपोषण केले आहे. राज्यभर आम्ही काळी दिवाळी साजरी करत आहोत, असे शिंदे यांनी सांगितले.

विरोधी पक्षाच्या पाठपुराव्यामुळे सरकारने घाईघाईत फसवी मदत जाहीर केली. परंतु सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे गरजेचे असताना केवळ विविध निकष लावून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच मदत पडत नसल्याच्या घटना समोर येत आहेत.

सरकार उद्घाटन आणि वेगवेगळे कार्यक्रम करून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा, संपूर्ण कर्जमाफी द्यावी, एकरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी, अशी आमची पूर्वीही मागणी होती आणि आत्ताही आहे. शेतकर्‍यांच्या बाबतीत दुजाभाव करणाऱ्या शासनाचा निषेध करतो. हे सरकार उलथवून टाकल्याशिवाय शेतकर्‍यांना न्याय मिळणार नाही. यासाठी आम्ही राज्यभर सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहोत.

या वेळी मानसिंग जगदाळे देवराज पाटील घनश्याम शिंदे राजकुमार पाटील अभयसिंह जगताप सतीश चव्हाण गोरखनाथ नलावडे अर्चना देशमुख मेघा नलवडे पांडुरंग भोसले बुवासाहेब पिसाळ वैशाली जाधव शैलजा कदम नलिनी जाधव विजय बोबडे सचिन जाधव सुनील सपकाळ गिरीश फडतरे राजाभाऊ जगदाळे संजय पिसाळ स्वप्नील वाघमारे किरण चौधरी युवराज पवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.