शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व आमदार अंबादास दानवे यांनी बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांच्या मतदारसंघात त्यांच्या विरुद्ध जोरदार टीका केली. शिरसाठ यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून दानवेंनी जोरदार हल्लाबोल केला. शिरसाठ यांचा सूर्याजी पिसाळ म्हणून उल्लेख केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेबाबत आमदार संजय शिरसाठ यांच्यावर दानवेंनी गंभीर आरोप केले. औरंगाबादमध्ये शिवसेनेचा शिवसैनिक मेळावा सुरू आहे. याठिकाणी दानवे बोलत होते.

अंबादास दानवे म्हणाले, “मी इतके दिवस बोललो नाही, पण आता बोलतो. संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होती. संजय शिरसाठ यांनी एक रुपयाची मदत केली का कुणी सांगावं? त्यांनी कोणतीही मदत केली नाही. उलट, वर्तमानपत्रात ‘संजय शिरसाठ यांना भाषण करून द्यायचं नाही’ असं छापून आणलं. मुख्यमंत्र्यांच्या सभेची पत्रिका शिवसेना भवनातून येते. ती काही संभाजीनगरची सभा नव्हती. हा शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे.”

“माझ्याकडे शिरसाठ यांचं फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्रामवरील सर्व रेकॉर्ड”

“पत्रात मतदारसंघात विरोधकांना निधी देण्यात आला, म्हणून आमचा जीव कासावीस होतो असं म्हटलं आहे. या मतदारसंघात कोण विरोधक आहे? दोन्ही मतदारसंघात विरोधक नाही. मग असं का लिहिलं जात आहे? माझ्याकडे जाहिराती आहेत. माझ्याकडे संजय शिरसाठ यांचं फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्रामवरील सर्व रेकॉर्ड आहे. यांनी स्वतः बरंच काही लिहिलं होतं,” असं अंबादास दानवे यांनी सांगितलं.

हेही वाचा : विश्लेषण : काय आहे पक्षांतर बंदी कायदा? शिंदे गटाकडून त्याला बगल दिली जातेय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुम्ही येथे आल्यावर तुमच्या समोर ढोल बडवणार”

“वाढदिवसाच्या जाहिरातीत लिहिलं ‘काम बोलतं तेव्हा ओरडावं लागत नाही, टीका करावी लागत नाही, ढोल बडवावे लागत नाही’. मग आता का ओरडलात? का पक्षप्रमुखांवर टीका करतात. तुम्ही येथे आल्यावर तुमच्या समोर ढोल बडवणार आहे,” असा थेट इशारा दानवेंनी बंडखोर आमदार शिरसाठ यांना दिला. यावेळी त्यांनी ३८३ कोटी रुपयांचा सहा पदरी रस्ता झाल्याचंही नमूद केलं.