मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यात गेल्या महिन्याभरात घेतलेल्या तीन सभांच्या पार्श्वभूमीवर आज होत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच अशा प्रकारे जाहीर सभा घेत असल्यामुळे या सभेत ते काय बोलणार? याविषयी मोठी चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ही ऐतिहासिक सभा होणार असून विरोधकांच्या प्रश्नांना उद्धव ठाकरे सडेतोड प्रत्युत्तर देणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी विरोधी पक्षांकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकांवर तोंडसुख घेतलं आहे.

“ही सभा ऐतिहासिक आहे. कोविड, लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांचं आजारपण यामुळे उद्धव ठाकरे अशा सभांच्या व्यासपीठावर मध्यंतरी आले नव्हते. ते आता येत आहेत. ही सभा लोकांच्या, विरोधकांच्या मनातल्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देणारी असेल. ही सभा फक्त त्यासाठीच नाही. गेल्या काही दिवसांत विरोधकांनी महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करण्याचा, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा, महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या पायावर हल्ले चालवले आहेत. या सगळ्याबाबत उद्धव ठाकरे परखडपणे बोलतील अशी आमची अपेक्षा आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“टोमणेसभा नसून फटके सभा”

उद्धव ठाकरेंची टोमणे सभा नसून फटके सभा असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. “महाराष्ट्रात विरोधी पक्षाचा नंगानाच सुरू आहे. विरोधी पक्षाची मती भ्रष्ट झाली आहे. त्यातून हे सगळं होतंय. पण आज होणारी उद्धव ठाकरेंची टोमणे सभा नसून हटके आणि फटके सभा आहे. ज्याला तुम्ही टोमणे म्हणता, त्याला आम्ही फटकारे म्हणतो. ते तुम्हाला कधीच जमणार नाही. ठाकऱ्यांची भाषा तुम्हाला जमणार नाही. तुम्हाला काय माहिती मराठी आणि महाराष्ट्राचा इतिहास?” असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

मनसेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह

“मनसे, भाजपाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. हे सगळे लोक वैफल्यग्रस्त असतात. त्यांच्या पदरी महाराष्ट्रात राजकीय अपयश आलेलं आहे. त्यांना लोकांनी जी विरोधकांची भूमिका दिली आहे, ती ते व्यवस्थित पार पाडत नाहीत. अशा वेळी सत्ताधाऱ्यांवर बेछूट आरोप करायचे, शिवसेनेवर चिखलफेक करायची, भूमिकांवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं. दुसऱ्या कुणाच्या कांद्यावर बंदूक ठेवून आरोप करायचे”, असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

“कुणीही सोम्यागोम्या उठला आणि…”

“शिवसेनेवर खुलासा करण्याची वेळ येणार नाही. शिवसेना आपल्या चालीने चालते. कुणीही सोम्यागोम्या उठला आणि काही आरोप केले, तर त्याला उत्तर देण्याची तशी गरज नाही. पण वातावरण गढूळ करून सरकारला काम करू द्यायचं नाही असं सुरू आहे. भोंगे, हनुमान चालीसा असे विषय काढले जात आहेत. महागाई, बेरोजगारी हे गंभीर प्रश्न आहेत. पण महाराष्ट्रातले विरोधक विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाहीत. आम्हाला महाराष्ट्रात भ्रष्टाचारमुक्त शासन द्यायचं आहे. पण त्याआधी गेल्या ५ वर्षांत जो भ्रष्टाचार झालाय, त्याची साफसफाई करावी लागले. तो चिखल फडणवीसांच्या काही सहकाऱ्यांनी केलाय. त्याला आम्ही हात लावायला गेलो, की असे मुद्दे काढले जात आहेत”, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.