प्रशासनाने सातारा जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याने टाळेबंदीचा एकतर्फी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे व्यावसायिक, शेतकरी सर्वसामान्यचे मोठे नुकसान होत आहे. आठवड्यात दोन दिवस कडक टाळेबंदीस विरोध नाही मात्र जिल्ह्यात लावलेली टाळेबंदी अन्यायकारक असून, प्रशासनाने टाळेबंदी ताबडतोब शिथिल करावेत, असं आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

साताऱ्यात व्यापाऱ्यांचा, सर्वसामान्यांचा नव्याने लावलेल्या टाळेबंदीला पूर्ण विरोध होत आहे. एक आठवडा शिथिल केलेले निर्बंध करोना रूग्ण वाढल्याने प्रशासनाने पुन्हा लागू केले असून, हे अन्यायकारक आहे. प्रशासनाने निर्बंध मागे घ्यावेत, कडक टाळेबंदी करु नये अशी भूमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकारासमोर मांडली. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ज्या सूचना दिल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मी अधिवेशनात मुद्दा मांडणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रशासनाच्या या निर्णया विरोधात शिवेंद्रराजेंनी नाराजी व्यक्त केली. आठवडाभरच निर्बंध शिथिल झाले होते. त्यामुळे व्यावसायिक, शेतकरी यांना संधी मिळाली होती. तीही आता गेली आहे. त्यामुळे प्रशासनाने घेतलेल्या कडक लॉकडाउनच्या निर्णयाला सगळय़ांचा विरोध आहे. काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला विरोध दर्शवला काहीनी आंदोलन करुन विरोध व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाला माझी एकच सूचना आहे. टाळेबंदी मागे घ्यावी, वेळेचे निर्बंध ठेवा परंतु कडक टाळेबंदी करु नका. दोन दिवसांची कडक टाळेबंदी करा. मात्र, घेतलेला हा निर्णय अन्यायकारक असा आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुण्यासारख्या शहरात रुग्ण संख्या वाढत नाही आणि साताऱ्यासारख्या लोकसंख्येने विरळ असलेल्या शहरात रुग्णसंख्या वाढत आहे, हे प्रशासनाचे अपयश असल्याचं आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी बोलून दाखवलं.

तसेच, तपासणी केंद्रावर तपासणी नंतर त्याच्या नोंदीबाबत फेरफार होत असल्याने व वेळच्यावेळी त्याची नोंद होत नसल्याने, संख्या वाढताना दिसत आहे. प्रशासनाने सर्व प्रतिनिधींशी चर्चा करुन निर्णय घ्यावा. पाच दिवसांमध्ये वेळेत दुकाने सुरु करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा अशी भूमिका त्यांनी मांडली.