राज्यात सध्या महाविकास आघाडीला अनुकूल असे वातावरण आहे. काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांची मते आजमावून घेतली जात आहेत. दोन दिवसांच्या या बैठकीनंतर लवकरच राज्यातील सर्व जिल्ह्याचे दौरे केले जातील, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

शुक्रवारी सिंधुदुर्ग रत्नागिरी, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर, शिर्डी, नाशिक, दिंडोरी, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ वाशिम, गडचिरोली चिमूर, भंडारा गोदिया, वर्धा, नागपूर, रामटेक आणि पालघर या मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. उर्वरित मतदारसंघाचा आढावा उद्या शनिवारी घेतला जाणार आहे.

बैठकीनंतर टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, निवडणुका केव्हाही लागल्या तरी काँग्रेस पक्ष तयार आहे. त्यादृष्टीने आढावा बैठकीत स्थानिक नेत्यांकडून माहिती घेतली जात आहे. विदर्भासह राज्यात विविध भागात काँग्रेसला मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकांना सामोरे जात आहेत. भाजपाला जो पराभूत करु शकेल त्यालाच उमेदवारी दिला जावी असा एकंदर सुरू आहे. मविआने एकास एक उमेदवार दिला तर भाजपाचे पानिपत करणे सोपे जाईल. भाजपाच्या हुकुमशाही, मनमानी व अत्याचारी सरकारला जनता कंटाळली आहे. जनतेला बदल हवा आहे, देशात परिवर्तनाचे वारे वाहत असून यावेळी राज्यात व दिल्लीतही बदल होईल हे चित्र आहे, असंही त्यांनी सांगितले.

हेही वाचाः शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, तुकाराम मुंढेंसह ‘या’ २० अधिकाऱ्यांची बदली, कुणाची कुठे वर्णी? वाचा…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद गटनेते सतेज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाचे सर्व माजी मंत्री उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचाः “शिवराज्याभिषेकास ६ जून २०२४ ला ३५० वर्षे होतात, पण…”, ‘त्या’ प्रकारावरून जितेंद्र आव्हाड संतापले

महाविकास आघाडीत बिघाडी व्हावी असा काही जणांचा प्रयत्न सुरू आहे, पण तसे काहीही होणार नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढवणार आहोत. काँग्रेस पक्ष मतदारसंघाचा आढावा घेत आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होऊन जागा निश्चित होतील. परंतु देशात सध्या असलेल्या ज्वलंत प्रश्नावरून भाजपा लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे, पण जनता आता भाजपाच्या भुलथापांना बळी पडणार नाही. शेतकऱ्यांच्या घरात अजून कापूस पडून आहे. शेतमालाला भाव नाही, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. मागील निवडणुकीत भाजपा व नरेंद्र मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण करू शकले नाहीत त्यावर जनतेत तीव्र नाराजी आहे. जनतेच्या प्रश्न घेऊन निवडणुका लढवू, असेही नाना पटोले म्हणाले.