scorecardresearch

“जिथे जिथे प्रभू रामचंद्र आणि हनुमंताला विरोध होईल तिथे….” नवनीत राणा पुन्हा आक्रमक

अमरावतीत नवनीत राणा यांनी एका धार्मिक कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

navneet rana
वाचा काय म्हटलं आहे नवनीत राणा यांनी?

जिथे जिथे प्रभू रामचंद्र आणि हनुमंताला विरोध केला जाईल तिथे मी डोक्याला कफन आणि भगवा बांधून उभी राहिन असा आक्रमक पवित्रा खासदार नवनीत राणा यांनी घेतला आहे. नवनीत राणा यांनी अमरावतीत हजारो महिलांच्या उपस्थितीत हनुमान चालीसा पठण केलं. त्यावेळीच त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडी ही प्रभू रामचंद्राचा विरोध करते हे मी आंदोलनाच्या वेळी पाहिलं असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

प्रभू रामचंद्रांची घोषणा द्या

अमरावतीत हा कार्यक्रम सुरू असताना नवनीत राणा म्हणाल्या की जय श्रीराम चा नारा इतका मोठ्याने द्या की प्रभू रामचंद्रांचा विरोध करणाऱ्या प्रत्येकापर्यंत हा आवाज पोहचला पाहिजे. कुणीही विरोध केला तरीही आमचा आवाज कधीही कमी होणार नाही. महिलांना कुणी शांत करू शकत नाही. अनादीकाळापासून महिला लढणारी आहे. महिला लढत राहणार आहे असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

या देशाची संस्कृती आम्ही पाळतोच आहोत. मात्र जय श्रीरामचा नारा आम्ही देणारच असंही नवनीत राणा म्हणाल्या. हक्काने लढणं हे आम्हाला आमच्या देशाने शिकवलं आहे. मी फक्त एवढंच म्हटलं होतं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी त्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणणार. फक्त एवढी घोषणा केल्यावर जर १४ दिवस मला तुरुंगात टाकलं होतं. तेव्हाच मी ठरवलं होतं की जिथे जिथे हनुमंताला आणि प्रभू रामचंद्राला विरोध झाला तर मी सहन करणार नाही.धर्माच्या विरोधात कुणीही उभं राहिलं तर त्यांच्या विरोधात सर्वात आधी मी उभी राहणार आहे.

महाराष्ट्र हनुमान चालीसेमुळे सुखी झाला आहे

महाराष्ट्राला सुखी ठेवण्यासाठी आपण हनुमान चालीसा पठण करणार होतो. ते आपण करून दाखवलं. कारण राज्यात आता हिंदू विचारांना मानणारं शिंदे-फडणवीस सरकार आलं आहे. आम्ही शेवटपर्यंत त्यांच्यासोबत उभे राहू यात माझ्या मनात काहीही शंका नाही असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. अमरावतीची खासदार आणि देशाची नागरिक म्हणून मला या ठिकाणी विकास करायचा आहे. मला सगळ्यांनी अमरावतीची सून म्हणून पाहिलं आहे. पण लढा देणारी महिला म्हणून तुम्ही मला वर्षभरापासून पाहात आहात असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

अमरावतीत १११ फुटांची हनुमानाची मूर्ती उभारणार

हनुमानाची एक मोठी मूर्ती आम्ही अमरावतीत उभी करणार आहोत. या गोष्टीला वर्ष लागलं तरीही चालेल. तरी येत्या काळात १११ फुटांची मूर्ती आपण अमरावतीत उभारणार आहोत अशीही घोषणा नवनीत राणा यांनी केली. आम्ही जेव्हा त्याची सुरुवात करू तेव्हा प्रत्येक घराने एक रूपया द्यावा आणि एक वीट आम्हाला द्या असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. हनुमान चालीसा अमरावतीमुळे संपूर्ण देशाला समजली आहे त्यामुळे आपण ही भव्य मूर्ती उभारणार आहोत असंही नवनीत राणांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 13:09 IST