शिवसेनेच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : अलहाबादचे प्रयागराज असे नामांतर केल्यावर फैजाबादचे अयोध्या तर अहमदाबादचे कर्णावती अशी नावे बदलण्याची भाजपची योजना असताना, राज्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद आणि खुल्ताबाद या शहरांची नावे बदलण्याची शिवसेनेने केलेली मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्य करणार का, असा प्रश्न आहे.

अलहाबादचे प्रयागराज असे नाव बदलल्यावर दोनच दिवसांपूर्वी फैजाबाद जिल्ह्य़ाचे नामांतर अयोध्या केले जाईल, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. त्याच वेळी गुजरातच्या अहमदाबादचे नाव कर्णावती असे बदलण्याचे संकेत उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी दिले आहेत. यापूर्वी उत्तर प्रदेशातील मुगलसराय रेल्वे स्थानकाचे दीनदयाळ उपाध्याय असे नामांतर करण्यात आले होते. राजस्थानमधील मुस्लीम नावाशी साधम्र्य असलेल्या छोटय़ा गावांची नावे मुख्यमंत्री वसुंधरराजे सरकारने बदलली होती. त्याआधी केंद्र सरकारने दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम असे नामांतर केले होते.

भाजपवर शिवसेनेची कुरघोडी

भाजपने उत्तर प्रदेश व राजस्थानात प्राचीन किंवा मुस्लीम नामसाधम्र्य असलेल्या शहरांची नावे बदलण्याचा सपाटा लावल्याच्या पाश्र्वभूमीवर राज्यातही काही शहरांची नावे बदलण्याची शिवसेनेची मागणी आहे. औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव तर खुल्ताबादचे रत्नप्रभा अशी नावे बदलावी, असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. उत्तर प्रदेश किंवा राजस्थानातील काही शहरांची नावे तेथील भाजप सरकारने बदलली. मग राज्यातील शहरांची नावे बदलण्यात काहीच हरकत नाही, असेही राऊत यांचे म्हणणे आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद, खुल्ताबाद आदी नावे परकीयांशी संबंधित आहेत. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याची मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९०च्या दशकात केली होती. उस्मानाबादच्या नामांतराची मागणी जुनी आहे. शिवसेनेच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांनी नक्कीच विचार करावा. आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी नेहमीच संवाद साधतो, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. शहरांच्या नामांतराबाबत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांच्याशी चर्चा करावी, असे मतही खासदार राऊत यांनी व्यक्त केले. सांगलीतील इस्लामपूरचेही नाव बदलण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी मागेच केली आहे.

शिवसेनेची मागणी मुख्यमंत्री फडणवीस वा भाजप मान्य करतील का, याबाबत उत्सुकता आहे. कारण मागणी मान्य झाल्यास शहरांची नावे बदलल्याचा राजकीय फायदा शिवसेनेला होऊ शकतो. युतीबाबत शिवसेनेकडून अद्याप विरोधी मते मांडली जात असल्याने शिवसेनेला राजकीय फायदा होईल, असे पाऊल भाजपकडून उचलले जाण्याची शक्यता कमी आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरे किंवा जिल्ह्य़ांमध्ये भाजपच्या तुलनेत शिवसेनेची ताकद जास्त आहे. औरंगाबादमध्ये शिवसेना नेहमीच खान हवा की बाण अशा भावनिक आधारावरच मते मिळविते, असा अनुभव आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर झाल्यास हिंदू मतांचे ध्रुवीकरण करणे शिवसेनेसाठी फायद्याचे ठरेल. तसेच नामांतर केल्यास औरंगाबादमधील अल्पसंख्याक समाज एमआयएमच्या मागे उभा राहण्याची शक्यता आहे. याचा फायदा भाजप किंवा शिवसेनेलाच होऊ शकतो. अल्पसंख्याक समाजाची एकगठ्ठा मते काँग्रेसला मिळाल्यास काँग्रेस उमेदवाराच्या विजयाची संधी वाढते. यामुळेच अल्पसंख्याक समाजाची मते एमआयएमला मिळावी म्हणजे ही मते काँग्रेस आणि एमआयएममध्ये विभागली जावीत, असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असेल.

गेल्या चार वर्षांत धार्मिक ध्रुवीकरण होईल, अशी कोणतीच कृती मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली नाही. यामुळेच शिवसेनेने मागणी केली तरीही मुख्यमंत्री लगेचच शहरांची नावे बदलण्यासाठी पुढाकार घेण्याबाबत साशंकता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will maharashtra cm rename aurangabad to sambhaji nagar
First published on: 10-11-2018 at 01:52 IST