त्या दिवशी सरांनी मला सांगितले, ‘‘बाई, क्लबचे दोघे पदाधिकारी शाळेत येऊन गेले. त्यांच्या क्लबतर्फे शाळांमधून विद्यार्थ्यांची कुष्ठरोगाची तपासणी केली जाणार आहे. त्यांचा दिवस आणि वेळ ठरेल त्याप्रमाणे ते कळवतील. पाचवीतल्या सर्व तुकडय़ांमधील मुलांची तपासणी करून घेऊ या. ही सर्व जबाबदारी तुमची. सर्व व्यवस्था तुम्ही पाहा.’’

ठरल्याप्रमाणे डॉक्टर आले. पाचवीतल्या एकेक तुकडीच्या मुलांना बोलावून घेऊन सर्वाची तपासणी करून घेतली. तपासणी पूर्ण झाल्यावर डॉक्टरांनी मला दोन मुलांची नावं सांगितली. म्हणाले, ‘‘बाई, या मुलांच्या पालकांना बोलावून घ्यायचं, त्यांना मुलांना घेऊन रुग्णालयात जायला सांगायचं; तिथले डॉक्टर तपासतील; त्यानंतर मुलांना उपचारासाठी बोलावतील. मुलांनी दर महिन्याला उपचारासाठी जायलाच पाहिजे. तुम्हाला या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करावा लागेल.’’

‘‘होय डॉक्टर, हे काम मी नक्की करीन.’’ मी म्हटले.

आणि मग माझ्या कामाला सुरुवात झाली. दोन्ही मुलांच्या पालकांना बोलावून घेतले. डॉक्टरांना आलेली शंका त्यांना समजावून सांगितली आणि उद्याच न विसरता मुलाला घेऊन रुग्णालयात जाऊन यायला सांगितले. एका विद्यार्थ्यांच्या आईने लगेच तयारी दर्शवली. मी त्यांना म्हटलं, ‘‘जाऊन आलात की डॉक्टर काय म्हणतात ते मला येऊन सांगा.’’

दुसऱ्या विद्यार्थ्यांचे पालक मात्र तयार होईनात. मी माझ्या परीने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हते; उलट काहीशा रागानेच म्हणाले, ‘‘आमचा मुळीच विश्वास नाही. आम्ही मुळीच जाणार नाही..’’ तणतणतच ते निघून गेले.

ज्या विद्यार्थ्यांला त्याची आई घेऊन गेली होती त्यांनी मला लगेच येऊन सांगितलं, ‘‘बाई, मी रुग्णालयात जाऊन आले. आता दर महिन्याच्या याच तारखेला डॉक्टरांनी बोलावले आहे.’’

मग माझे एक नवीन काम सुरू झाले. रुग्णालयात जायच्या आदल्या दिवशी मी त्या मुलाला बोलावून घ्यायची, ‘‘उद्या तुला रुग्णालयात जायचं आहे लक्षात आहे ना? घरी गेलास की आईला आठवण कर आणि जाऊन आलास की शाळेत आल्यावर मला सांगायचं.’’ असं त्याला बजावलं. माझं हे काम ४/५ महिने तरी न विसरता सुरू होते. मग एक दिवस त्याची आई शाळेत आली. म्हणाली, ‘‘बाई, अहो, दर महिन्याला अगदी न विसरता मला आठवण करण्यासाठी निरोप देता. अहो, तुम्ही इतकं करता.. तुम्ही खरंच नका त्रास घेऊ.. मी तर आई आहे ना त्याची. मी न विसरता दर महिन्याला त्याला घेऊन जात जाईन.. नका काळजी करू..’’

त्यानंतर त्याला निरोप देण्याचे माझे काम संपले. मग मी हळूहळू ते विसरूनही गेले. आणि दोनेक वर्षांनी केव्हा तरी ९ वीतला एक विद्यार्थी काही कामासाठी माझ्याकडे आला होता. त्याला त्याचे नाव विचारले. त्याचे आडनाव ऐकल्यावर मला ते परिचयाचे वाटले, क्षणात सारे आठवले आणि उत्सुकतेने त्याला विचारले, ‘‘अरे, तो तुझाच भाऊ का? पाचवीत असताना रुग्णालयात जात होता..’’

‘‘हो, हो बाई, आता तो चांगला आहे’’ तो आनंदाने म्हणाला. म्हटलं, ‘‘अरे, त्याला सांग बाईंनी एकदा भेटायला बोलावलं आहे.’’ त्याच दिवशी शाळा सुटल्यावर लगेचच तो आला. अगदी खुशीत, उत्साहात! आल्या आल्या आपला हात माझ्यासमोर धरून म्हणाला, ‘‘बाई, बघा, आता अजिबात डाग नाही माझ्या हातावर. मी बरा झालो बाई.’’

हे सांगताना त्याचा चेहरा आनंदाने फुलला होता. माझे मनही त्याच आनंदाने अगदी तुडुंब भरले होते! मनोमन त्या क्लबला पुन्हा एकदा धन्यवाद दिले. पण.. पण.. त्या आनंदाच्या क्षणीही माझ्या मनात एक सल कुठेतरी सलत होता.. वाटत होतं त्या दुसऱ्या विद्यार्थ्यांचं काय झालं? कसा असेल तो? याआधीच आपणच एकदा चौकशी करायला हवी होती.. पण त्याचे पालक तरी असे कसे? किती समजावण्याचा प्रयत्न केला.. पण पटलंच नाही त्यांना!..

आता वाटतं.. मी एक करायला हवं होतं, क्लबच्या डॉक्टरांशी बोलून त्यांनाच त्या पालकांचं समुपदेशन करण्यासाठी बोलवायला हवं होतं.. पण आता फक्त जर आणि तरच उरला होता..

– शालिनी करंदीकर