गेल्या काही दिवसांपासून ‘टी सीरिज’चे सर्वेसर्वा दिवंगत गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित ‘मोगुल’ हा चित्रपट येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आमिर खान प्रॉडक्शन्स आणि टी सीरिज मिळून या बायोपिकची निर्मिती करणार होते. मात्र या चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर असलेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांमुळे आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव या दोघांनीही आपण चित्रपट करणार नसल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले होते. आता आमिर या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे म्हटले जात आहे.

आमिरने एका मुलाखतीदरम्यान ‘मोगुल’ चित्रपटाबद्दल वक्तव्य केले आहे. ‘किरण आणि मी मोगुल चित्रपटाची निर्मिती करणार आहोत आणि या चित्रपटात मी अभिनय देखील करणार आहे. सुरुवातीला चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप असल्याचे आम्हाला माहिती नव्हते. माझ्या मते त्यांच्यावर लावण्यात आलेले हे आरोप ४-५ वर्षांपूर्वीचे आहेत. गेल्या वर्षी मी टू मोहिम सुरु झाली आणि त्यांच्यावरील आरोप सर्वांसमोर आले. त्यानंतर आम्ही दोघेही मानसिकदृष्ट्या अस्थिर झालो. मी आणि किरण एक आठवडाभर काय करावे याचा विचार करत होतो’ असे आमिर म्हणाला.

आणखी वाचा : ‘घरी घेऊन ये, पैसे वाचतील’ रणवीरच्या त्या फोटोवर दीपिकाची कमेंट

त्यानंतर आमिरला पुन्हा ‘मोगुल’ चित्रपटासाठी दिलेल्या होकाराबद्दल विचारण्यात आले. ‘माझ्यामुळे एका व्यक्तीचे काम अडचणीत आले. त्यामुळे माझी झोप उडाली. मी आणि किरणने सुभाषसोबत गेली ५-६ वर्ष काम करणाऱ्या महिलांना भेटण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आम्हाला एक महिला अशीही भेटली जिने सुभाषबद्दल काहीच वाईट सांगितले नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्याने कोणत्या महिलेसोबत गैरवर्तन केले नसेल. मला याबद्दल फार काही माहित नाही. त्यामुळे मी कोणाला दोषी ठरवू शकत नाही. त्यानंतर आम्ही फार विचार केला आणि IFTDA ला या बाबत विचार करत असल्याचे कळवले’ असे आमिर पुढे म्हणाला.