“अनुपम खेर यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही ते विदुषक आहेत,” असा टोला ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी अनुपम खेर यांना लगावला होता. या वादग्रस्त वक्तव्यावर अनुपम खेर यांनी शाह यांना प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले अनुपम खेर ?

“नसिरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीत माझी स्तुती केली. तो व्हिडीओ मी नुकताच पाहिला. मी नसिरुद्दीन शाह यांचा खुप आदर करतो. त्यामुळे मी कधीच त्यांची निंदा केली नाही. आणि त्यांच्या कुठल्याच वक्तव्याला गांभीर्याने घेतले नाही. तुम्ही आपल्या कारकिर्दीत प्रचंड यश मिळवले. परंतु यानंतरही तुमचे आयुष्य नैराश्येतच गेले आहे. तुम्ही दिलीप कुमार, राजेश खन्ना, शाहरुख खान, विराट कोहली, अमिताभ बच्चन यांच्यावर देखील टीका केली. परंतु कोणीच तुम्हाला गांभीर्याने घेतले नाही. कारण आम्हाला माहिती आहे, की तुम्ही ज्या पदार्थांचे सेवन करता त्यामुळे तुम्हाला काय योग्य आणि काय अयोग्य यातला फरकच कळत नाही. माझ्यावर टीका करण्याचा आनंद मी तुम्हाला भेट करतो. माझ्या रक्तात हिंदूस्तान आहे.” अशा शब्दात अनुपम खेर यांनी नसिरुद्दीन शाह यांना प्रत्युत्तर दिले.

यापूर्वी नसिरुद्दीन शाह काय म्हणाले होते?

नसिरुद्दीन शाह आपल्या मुलाखतीमध्ये देशामधील सध्याची परिस्थिती, देशात वाढणारा धार्मिक भेदभाव आणि यासंदर्भात चित्रपट सृष्टीमधील मोठी नावं का शांत आहेत याबद्दल मत व्यक्त केलं होतं. “मी ट्विटरवर नाही. ट्विटवर असणाऱ्यांनी आपले काय ते एक ठाम मत तयार करण्याची गरज असल्याचे मत वाटते. अनुपम खेरसारखे लोक या माध्यमांवर खूपच बोलतात. पण त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज आहे असं मला वाटतं नाही. ते विदुषक आहेत. त्यांच्याबरोबर एनएसडी, एनएफटीआयआयमध्ये असणाऱ्यांना विचारुन तुम्ही त्यांच्या स्वभावाबद्दलची खात्री करुन घेऊ शकता. ते त्यांच्या रक्तातच आहे. तुम्ही त्याबद्दल काहीच करु शकत नाही,” अशा शब्दांमध्ये शाह यांनी खेर यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.